Marathi Serial TRP Updates : छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही दर आठवड्याच्या टीआरपी रेटिंगवरून ठरवली जाते. गेल्या साडेतीन वर्षांपासून यामध्ये सायली-अर्जुनची ‘ठरलं तर मग’ मालिका बाजी मारताना दिसतेय. कारण, अनेक नव्या मालिका सुरू होऊनही ‘ठरलं तर मग’ने आपलं पहिलं स्थान अजिबात गमावलेलं नाहीये. या मालिकेचा चाहतावर्ग आणि लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढतेय. नुकताच १६ मे ते २२ मे या आठवड्याभराचा टीआरपी BARC इंडियाने जाहीर केला. याद्वारे टॉप-१० मालिका कोणत्या आहेत जाणून घेऊयात…

गेल्या आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टनुसार ‘स्टार प्रवाह’च्या सायंकाळी ६:३० ते रात्री ११:३० पर्यंतच्या सगळ्या मालिका स्लॉट लीडर ठरल्या आहेत. टीआरपीमध्ये पहिल्या-दुसऱ्या स्थानी नेहमीप्रमाणे ‘ठरलं तर मग’ आणि ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिका आहेत. तर, तिसऱ्या स्थानावर ‘आनंदी’ची एन्ट्री झाली आहे. ‘आनंदी’ मालिका मार्च महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेला अवघ्या दोन महिन्यांत प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळतेय. ‘आनंदी’ ९:३० वाजताची स्लॉट लीडर मालिका ठरली आहे. ‘आनंदी’ने ‘तारिणी’ला मागे टाकलं आहे.

टीआरपीमध्ये चौथ्या स्थानी ‘सनई चौघडे’ आणि ‘कमळी’ या मालिका आहेत कारण, गेल्या आठवड्यात प्रेक्षकांना या दोन्ही मालिकांचा महासंगम पाहायला मिळाला होता. तर, ‘तारिणी’ पाचव्या स्थानी आहे. आता येत्या जून महिन्यात ‘तारिणी’ने प्रेमाची कबुली दिल्यावर या मालिकेच्या टीआरपीमध्ये मोठी वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॉप १० मालिका

  1. ठरलं तर मग
  2. तू ही रे माझा मितवा
  3. आनंदी
  4. सनई चौघडे आणि कमळी महासंगम
  5. तारिणी
  6. बाई तुझा आशीर्वाद
  7. मी सावित्रीबाई जोतीराव फुले
  8. दीपज्योती
    वीण दोघांतली ही तुटेना
    देवमाणूस ( तिन्ही मालिकांना सारखंच रेटिंग )
  9. घरोघरी मातीच्या चुली
  10. लग्नानंतर होईलच प्रेम

‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही तेजश्री प्रधानची मालिका गेली काही महिने टीआरपीच्या शर्यतीत टॉप-५ मध्ये होती. मात्र, गेल्या आठवड्यात या सिरियलचा टीआरपी घसरल्याचं पाहायला मिळतंय. तेजश्रीची मालिका आठव्या स्थानी आहे. तर, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सायंकाळी सात वाजताची स्लॉट लीडर असली तरीही संपूर्ण यादीत या मालिकेची सुद्धा दहाव्या स्थानी घसरण झाली आहे.

दरम्यान, आता येत्या काही महिन्यांत ‘स्टार प्रवाह’ आणि ‘झी मराठी’ या दोन्ही वाहिन्यांवर एकापेक्षा एक दर्जेदार मालिका सुरू होणार आहेत. त्यामुळे या नव्या मालिकांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.