Abhijeet Sawant Buys New Car : महाराष्ट्रात सर्वत्र गुढीपाडवा हा सण आनंदात साजरा केला जात आहे. या शुभमुहूर्तावर अनेकजण नवीन वस्तूंची खरेदी करतात. मराठी इंडस्ट्रीतल्या कलाकारांनी आजच्या गुढीपाडव्यानिमित्त नवीन घरं खरेदी केली. अभिनेता अंशुमन विचारेने त्याचे तिसरे घर खरेदी केले, तर सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांनीसुद्धा नव्या घरात गुढीपाडवा साजरा केला. तसंच ‘बिग बॉस मराठी ५’फेम अंकिता वालावलकरनेसुद्धा नवीन घर घेतल्याची खूशखबर शेअर केली आहे.
अशातच ‘बिग बॉस मराठी ५’मधील आणखी एका स्पर्धकाने आजच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. हा स्पर्धक म्हणजे, गायक अभिजीत सावंत. ‘इंडियन आयडल’ या गाण्याच्या शोचा विजेता ठरलेल्या अभिजीत सावंतने ‘बिग बॉस मराठी ५’मधून सर्वांची मनं जिंकली. या शोचा तो उपविजेता ठरला होता.
अभिजीत सावंतने खरेदी केली BMW कार
अभिजीत सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो स्वत:चे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असतो. अशातच आता त्याने गुढीपाडव्यानिमित्त नवीन कार खरेदी केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिजीतने बीएमडब्ल्यू कंपनीची X5 ही आलिशान कार खरेदी केली आहे. अभिजीतची पत्नी शिल्पा आणि त्याच्या दोन्ही लेकी ही कार खरेदी करायला गेल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे.
गायकाच्या पत्नीने स्वत:च्या हस्ते नव्या आलिशान कारची पूजा केली. तसंच अभिजीतनेसुद्धा नारळ वाढवून गाडीची पूजा केली. त्यानंतर सहकुटुंब सहपरिवार ते ही कार घरी घेऊन आले. हा व्हिडीओ शेअर करत अभिजीतने “नवी सुरुवात… नवे आशीर्वाद… या सगळ्यासाठी मनापासून कृतज्ञ आहे”, अशी पोस्ट शेअर केली आहे.
अभिजीत सावंतने शेअर केलेला व्हिडीओ
अभिजीतने शेअर केलेल्या या नव्या गाडीच्या खरेदीच्या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये त्याच्यावर मराठीसह हिंदीतल्या अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मेघा धाडे, जान्हवी किल्लेकर, करण सोनावणे या ‘बिग बॉस’मधील कलाकारांनी त्याला नवीन गाडीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याच्या गायक मित्रांनीसुद्धा या बीएमडब्ल्यू कारबद्दल त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिजीतच्या अनेक चाहत्यांनीसुद्धा त्याचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, अभिजीत सावंत हा मराठी इंडस्ट्रीतला लोकप्रिय गायक आहे. मराठीसह त्याची अनेक हिंदी गाणीसुद्धा लोकप्रिय आहेत. ‘मोहब्बतें लुटाऊंगा’, ‘जुनून’, ‘लफ्झों में’, ‘तेरे बिना’ या हिंदी आणि ‘सर सुखाची श्रावणी’ आणि नुकत्याच आलेल्या ‘ही चाल तुरू तुरू’, ‘गोरी गोरी पान फुलासारखी’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात’ यांसारख्या मराठी गाण्यांनी त्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे.
