Rajashri Nikam Accident Story : नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे राजश्री निकम. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र, या क्षेत्रात येण्याआधी त्यांनी बराच संघर्ष केला आहे. याच संघर्षाच्या काळात त्यांचा अपघातसुद्धा झाला होता, ज्याबद्दल त्यांनी नुकतीच एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली.

FM KMW 29 या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राजश्री त्यांच्या अपघाताबद्दल म्हणाल्या, “मी जॉब सोडला आणि तीन महिन्यांनी माझा अपघात झाला. मला कारनं उडवलं होतं. १८ वर्षांखालील मुलं गाडी चालवत होती, त्यांनी मला धडक दिली. तेव्हा मी बेशुद्ध झाले होते. त्यानंतर मला थेट हॉस्पिटलमध्येच शुद्ध आली. तेव्हा वामन केंद्रे (दिग्दर्शक), विनय येडेकर, सुधीर जोशी, पुष्कर श्रोत्री यांनी माझी खूप काळजी घेतली. त्यानंतर वर्षभर काम नव्हतं. कारण- मी जे नाटक करत होते, तेसुद्धा बंद झालं होतं.”

याच मुलाखतीत त्यांनी सुरुवातीच्या संघर्षाबद्दलही सांगितलं. त्या म्हणाल्या, “नाटकासाठी मला माझा जॉब सोडावा लागला होता. मी नाटक करत असतानाच जॉबसुद्धा करत होते. अनेकदा खोटी कारणं देऊन नाटकांचे दौरे केले; पण एकदा वरिष्ठांनी मला याबाबत विचारलं. त्यांनी माझ्या नाटकाच्या दौऱ्याची जाहिरात वर्तमानपत्रात पाहिली होती. तेव्हा मला माझे वरिष्ठ म्हणाले की, तू ठरव, तुला जॉब करायचा आहे की नाटक. कारण- नाटकासाठी तू जॉबवर सुट्या करतेस, जे परवडणारं नाही. मला तेव्हा नाटकात मिळणारं मानधन कमी होतं आणि जॉबवर मला बऱ्यापैकी पगार होता. साहजिकच आर्थिक गणित जुळत नव्हतं. त्यामुळे वरिष्ठांनी जॉब किंवा नाटक यापैकी कुठलाही एक पर्याय निवडण्यास सांगितल्यावर मी नाटक निवडलं. तेव्हा त्यांनी मला फोनवरच खूप मोठी होशील, असं म्हटलं होतं. त्यानंतर मी संघर्ष केला आणि मला पहिली दामिनी ही मालिका मिळाली.”

दरम्यान, राजश्री यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी याआधी ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘लाडाची मी लेक गं’, ‘मोलकरीण बाई’, ‘एक घर मंतरलेलं’ व ‘लाखात एक आमचा दादा’ अशा काही मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्याशिवाय त्यांनी ‘सोयरीक’ आणि ‘व्हॅनिला स्ट्रॉबेरी चॉकलेट’ या चित्रपटांतही काम केलं आहे.