Rohini Ninawe Remuneration to Writer : मालिकेमध्ये जितकी महत्त्वाची भूमिका अभिनेता, अभिनेत्री आणि दिग्दर्शकाची असते तितकीच महत्त्वाची भूमिका ही लेखकांची देखील असते. एखाद्या कलाकृतीच्या यशाचे श्रेय अनेकदा दिग्दर्शिक आणि कलाकारांना दिले जाते. मात्र कथा मांडण्यासाठी लेखकाने घेतलेली मेहनत लक्षात घेतली जात नाही. अनेकदा लेखकांचे नावदेखील समोर येत नाही. लेखकाला मानच मिळत नाही तर मानधनाची अवस्था खूपच बिकट असल्याची खंत लेखिका रोहिणी निनावे यांनी व्यक्त केली आहे.
पटकथाकार रोहिणी निनावे यांनी ‘मित्रम्हणे’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांचे मालिका लेखनातील अनुभव, आठवणी आणि लेखकांची मानधनाबाबत असणारी वास्तवदर्शी परिस्थिती मांडली आहे. सध्या मालिकांचे जे कट-कारस्थान असणारे विषय आहेत याबाबत विचारण्यात आले. यावर लेखिका रोहिणी निनावे म्हणाल्या की, पूर्वी लोक आवडीने मालिका बघायचे कारण त्यांच्या आयुष्याचे प्रतिबिंब या मालिकांमध्ये दिसून येत होते. आजच्या ज्या मालिका आहे त्यामध्ये घडणारे हे प्रेक्षकांना रोजच्या आयुष्यातील वाटतच नाही. हे काही तरी वेगळंच सुरु असल्याचे लोकांना वाटते. तो काळ वेगळा होता आणि तेव्हा लिहिण्याचा आनंद वेगळाच होता, असे मत रोहिणी निनावे यांनी व्यक्त केले आहे.
म्हणून मालिकांचा दर्जा निघून गेला…
पुढे त्या म्हणाल्या की, सध्या मालिका पूर्ण आठवडा सुरु असून ४० मिनिटांचा एक एपिसोड करण्यात आला आहे. चॅनलमध्ये स्पर्धा वाढली आहे. प्रेक्षकवर्ग बदलला असून सातत्याने एक प्रेशर असते. प्रेक्षक लगेच दुसऱ्या चॅनलवर जातील म्हणून सनसनाटी निर्माण करणारे लिहिले जाते. नुसती षडयंत्र दाखवली जातात. मी स्वतः सुद्धा लिहिते कारण तो आमचा व्यवसाय आहे. अतिरंजक मालिका दाखवत असल्यामुळे मालिकांचा दर्जा निघून गेला असल्याचे वाटते, आपल्याला हवे ते लिहिता येत नाही, अशी खंत रोहिणी निनावे यांनी व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर लेखकांना मिळणाऱ्या मानधनाबाबत लेखिका रोहिणी निनावे यांनी परखड भूमिका घेतली आहे. त्या म्हणाल्या की, खूप वाईट वाटते की लेखकाला काही मान मिळत नाही. मानधनाची तरी खूपच वाईट अवस्था आहे. अक्षरशः आपण केलेल्या कामाचे पैसे भीक मागितल्यासारखे मागावे लागतात. शंभर वेळा फोन करावे लागतात. इतके पैसे बुडवतात. काही प्रोडक्शन हाऊसमध्ये सांगावे सुद्धा लागत नाही की कामाचे पैसे द्या. पण काही ठिकाणी खूपच तगादा लावावा लागतो. यामुळे खूप वाईट वाटते. कारण आमची घरे सुद्धा याच पैशांवर चालतात, अशी परिस्थिती लेखिका रोहिनी निनावे यांनी मांडली आहे.
लेखनापेक्षा भाजीपाला विकलेला परवडला – रोहिणी
पुढे त्या म्हणाल्या की, मी तर मालिकांसाठी इतके वर्षे झाली, लेखन करत आहे. तरी माझी ही अवस्था आहे. तर नवीन काम करणाऱ्या लोकांची तर अवस्था असेन, याचा विचार करा, अशा स्पष्ट शब्दांत रोहिणी यांनी लेखकांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याचे सांगितले आहे. “प्रचंड पैसे बुडवतात. काही लोक दोन दोन वर्षे टीडीएस भरत नाहीत आणि तो आपल्याला भरावा लागतो. जीएसटी कट करतात. इतके हे सगळे टेक्निकल झाले आहे की, लेखनापेक्षा भाजीपाला विकलेला परवडला. पण इतके काम करुन स्वतःचे पैसे मिळवण्याठी एवढे प्रयत्न करावे लागतात. एवढावेळा सांगावे लागते, कधी कधी वाटते आपल्यावर का ही अशी वेळ येते. माझे पहिल्या मालिकेपासून लोकांनी पैसे बुडवले आहेत. अगदी १०० एपिसोडचे पैसे लोकांनी बुडवले आहे, अशी मनोरंजन विश्वातील परिस्थिती लेखिका रोहिणी निनावे यांनी नमूद केली आहे.
लोकप्रिय मालिकांचे केले आहे लेखन
लेखिका रोहिणी निनावे यांनी ३० वर्षे मालिका लेखन केले आहे. त्यांनी १२ हजारपेक्षा जास्त एपिसोडचे लेखन केले आहे. पहिला डेलीस्कोप दामिनीपासून त्यांनी मालिका लेखनाला सुरुवात केली. रोहिणी यांनी ‘अवंतिका’, ‘अवघाचि संसार’, ‘तुझी माझी रेशीमगाठ’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांचे लेखन केले आहे.
