MasterChef India 9 contestant: ‘मास्टरशेफ इंडिया’ हा लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. या शोमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेकजण सहभागी होतात. यात विविध पद्धतीचे पदार्थ बनवले जातात. जज या स्पर्धकांना विविध टास्क देतात, त्यामुळे हा शो लोकप्रिय आहे.

यावर्षी मास्टरशेफ इंडियाचे स्वरूप वेगळे आहे. स्पर्धक हे जोड्यांमध्ये असणार आहेत. या सीझनमध्ये लोकप्रिय शेफ कुणाल कपूर, रणवीर ब्रार, विकास खन्ना हे जज असणार आहेत. सध्या ते विविध स्पर्धकांना भेटत आहेत, ऑडिशन घेत आहेत, त्यांच्या गोष्टी जाणून घेत आहेत.

अशाच स्पर्धकांपैकी एक बिकानेरमधील पार्वती सोनी आहेत. त्या, त्यांचा मुलगा हिमांश सोनीबरोबर मास्टरशेफ इंडिया किचनमध्ये आल्या. त्यांच्या गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

“मी तीन वर्षांपासून…”

पार्वती या बिकानेरमधील प्रोफेशनल शेफ आहेत. शोमध्ये त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या, “मी सध्या जयपूरमध्ये राहते, मी तिथे राजघराण्याच्या मालकीच्या सिटी पॅलेसच्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये नोकरी करते. मी तीन वर्षांपासून तिथे सीडीपी (Chef de Partie) आहे. कर्मचाऱ्यांमध्ये ८० पुरुष आहेत आणि टीममध्ये मी एकमेव महिला आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “आमचे लग्न झाल्यापासून माझे पती, मी माझे शिक्षण पूर्ण करावे असा आग्रह करत होते. मी नववीपर्यंत शिकले होते, म्हणून त्यांनी मला माझे शालेय शिक्षण पूर्ण करून पुढेही शिक्षण घ्यावे असे सांगितले. मी एका रूढीवादी समाजातून येते, त्यामुळे मला असे वाटायचे की लग्नानंतर कोण शिक्षण घेते? जेव्हा माझी मुले मोठी झाली तेव्हा तेही आग्रह करत राहिले.”

त्यांनी पुढे सांगितले की, त्यांचा मुलगा हिमांश जेव्हा दहावीत होता, त्यावेळी त्यांनीही त्यांचा दहावीचा फॉर्म भरला होता. त्या म्हणाल्या, “माझ्या मुलाने आमच्या दोघांचे दहावीचे फॉर्म भरले होते, आम्ही दहावी आणि बारावी एकत्र केली.”

पार्वती पुढे म्हणाली, “आता माझ्या पतीला वाटते की मी आयएचएम (इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट) मध्ये शिक्षण घ्यावे. माझा मुलगा व्हिडीओ कॉलद्वारे मला बारावीचा अभ्यास करायला लावत असे. माझ्या पतीने खूप संघर्ष केला आहे. कठीण काळ पाहिला आहे. त्यांच्या आईचे शिक्षण हे आठवीपर्यंत झाले होते, त्यांनी तिला दहावीपर्यंत शिक्षण घ्यायला लावले.”

पार्वती आणि हिमांश ऑडिशनमध्ये पात्र ठरले. आता ते मास्टरशेफ इंडिया ९ मध्ये प्रवेश करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हा शो सोनी टीव्ही आणि सोनी लिव्हवर पाहता येतो.