MasterChef India 9 Winners : ‘मास्टरशेफ इंडिया सीझन ९’ या कुकिंग शोचा ग्रँड फिनाले सोहळा नुकताच पार पडला. यंदा या शोमध्ये पहिल्यांदाच एका मराठमोळ्या जोडीने बाजी मारली आहे. अजिंक्य गंधे आणि विक्रम गंधे हे दोघे भाऊ मूळचे नागपूरचे. या दोघांनी यावर्षीचा ‘मास्टरशेफ’ खिताब जिंकला आहे. सध्या संपूर्ण देशभरातून गंधे ब्रदर्सवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

विक्रम गंधे सध्या ३१ वर्षांचा आहे. त्याने सिटी प्रीमियर महाविद्यालयातून कॉमर्स शाखेतून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. यानंतर विक्रम फॅमिली बिझनेस सांभाळत होता. तर, २९ वर्षीय अजिंक्य गंधेने आर्किटेक्चर आहे. या दोघांना लहानपणापासूनच स्वयंपाकाची आवड होती.

विक्रम गंधे अनेक वर्षे त्यांचा फॅमिली बिझनेस सांभाळत होता. पण, करोना काळात परिस्थिती बदलली. बिझनेस सोडून या दोन्ही भावांनी स्वत:ची आवड जपण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयात कुटुंबाने मोठी साथ दिली. यानंतर दोघांनी नागपूरमध्ये स्वत:चा कॅफे सुरू केला. पण, यांना खरी ओळख मास्टरशेफमुळे मिळाली. आता गंधे ब्रदर्स घराघरांत पोहोचले आहेत.

शोमध्ये पहिल्या दिवसापासून गंधे ब्रदर्सची कामगिरी उत्तम राहिली होती. विकास खन्ना, रणवीर ब्रार आणि कुणाल कपूर या तिन्ही सेलिब्रिटी शेफनी त्यांचं नेहमीच कौतुक केलं. अखेरीस गंधे ब्रदर्सची सगळी मेहनत फळाला आली आणि त्यांनी हा शो जिंकला. यंदा अंजू प्रधान आणि मंजू ओझा या बहिणींची जोडी मास्टशेफची पहिली उपविजेती जोडी ठरली आहे. तर, चंदना आणि साई श्री राचकोंडा या आई-मुलीची हैदराबाद येथील जोडी द्वितीय उपविजेती ठरलीये.

गंधे ब्रदर्सला हा शो जिंकल्यावर त्यांना बक्षीस म्हणून जवळपास २५ लाख रुपये आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. याशिवाय या दोघांना ‘Golden Apron’ देखील दिला आहे. या दोन्ही भावांवर संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच या दोघांच्या पाककौशल्याचं सोशल मीडियावर कौतुक केलं होतं.

पहिल्यांदाच मराठमोळ्या जोडीने जिंकला मास्टरशेफ शो…

  • सीझन १- पंकज भदोरिया
  • सीझन २- क्षिप्रा खन्ना
  • सीझन ३- रिपू हांडा
  • सीझन ४- निकिता गांधी
  • सीझन ५- किर्ती भोयूटिका
  • सीझन ६- अभिनास नायक
  • सीझन ७- नयनज्योती साईकिया
  • सीझन ८- मोहम्मद आशिक
  • सीझन ९- विक्रम आणि अजिंक्य गंधे

दरम्यान, ‘मास्टरशेफ इंडिया सीझन ९’च्या ग्रँड फिनाले सोहळ्याला प्रसिद्ध शेफ संजीव कपूर सुद्धा उपस्थित होते.