कलाविश्वात अनेक कलाकारांमध्ये खास नाते असते. त्यांच्यातील खास बॉण्डिंगबद्दल चाहत्यांना नेहमीच जाणून घ्यायची उत्सुकता असते. आता ‘खुलता खळी खुलेना’, ‘इमली’ यासारख्या मालिकांतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh)ने ज्येष्ठ अभिनेते संजय मोने (Sanjay Mone) यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव तसेच त्यांच्याबरोबर असलेले बॉण्डिंग यावर अभिनेत्रीने केलेले वक्तव्य चर्चेत आहे.
मयुरी देशमुख काय म्हणाली?
अभिनेत्री मयुरी देशमुखने सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीला संजय मोनेंबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता, असा प्रश्न विचारला. यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “खूप कमाल अनुभव होता. आम्ही गमतीत म्हणतो की, इंडस्ट्रीमध्ये जी चार-पाच लोकं आहेत, ज्यांच्याशी मोने खूप छान वागतात, त्यांच्यावर त्यांचं खूप प्रेम आहे, त्यातली मी, ओमप्रकाश शिंदे, अभिज्ञा भावे, शर्वरी लोहकरे अशी आम्ही काही जण आहोत. आमच्यावर खरंच ते मनापासून प्रेम करतात.”
पुढे याबद्दल अधिक बोलताना मयुरी देशमुखने म्हटले, “अगदी सुरुवातीला मी जेव्हा नाटक करत होते, मी आणि आमचे जे दिग्दर्शक अजित भुरे सर, आम्ही कास्टिंग करत होतो. आम्ही आजोबांच्या भूमिकेसाठी शोध घेत होतो आणि बरीच नावं फायनल झाली होती. त्यातलं एक नाव फायनल झालं, पण ते आजोबा रिहर्सलला येत नव्हते; तर आम्हाला कळत नव्हतं, ते नाटक ओपन करायचं होतं. संजय मोने आणि अजित भुरे मित्र आहेत. संजय मोने मला मुलगी मानतात, तर त्यांनी आम्हाला विचारलं की काय झालं? तर मी त्यांना म्हटलं की आम्हाला नाटक ओपन करायचं आहे, पण रिहर्सलला आजोबाच येत नाहीयेत. ते प्रत्यक्षात करतील, ते एकपाठी आहेत, पण माझं पहिलं दोन पात्रांचं कमर्शिअल नाटक आहे; त्यामुळे मला वेळ लागणार. त्यांचा मोठेपणा, संजय मोने मला म्हणाले, एवढंच आहे ना, मी स्टॅन्ड बाय म्हणून येतो. मला एक आठवडा वेळ आहे. आपण माझ्याबरोबर हे नाटक बसवूया. त्याच्यानंतर तुमचे जे कोणी आजोबा आहेत ते येतील, त्यानंतर मी जाईन. त्यांचं हे वागणं मला खूप काही शिकवून गेलं. इतक्या सहज त्यांनी आम्हाला मदत केली. दोन-तीन वाचनातच आमचं असं झालं की, यांच्याशिवाय आता आजोबा दिसतच नाहीयेत. मग आम्ही त्यांना विनंती केली की, तुम्हाला जर नाटक आवडलं असेल तर प्लीज तुम्ही आजोबांची भूमिका करता का? कारण तुम्ही उत्तम करताय.”
“आमचं वैयक्तिक बॉण्डिंग चांगलं आहे. कारण आम्ही ‘खुलता कळी खुलेना’मध्ये जवळजवळ एक-दीड वर्षे एकत्र होतो. त्यांच्याबरोबर असलेलं हे नातं खरं आहे. त्यांनी त्यांच्या वागणुकीतून दाखवलं की मी फक्त म्हणायचं म्हणून मुलगी म्हणत नाही. ज्या क्षणी आम्हाला गरज होती, त्या वेळेला ते आमच्या मदतीला आले. हा किस्सा मी मुद्दाम प्रत्येक ठिकाणी सांगते, कारण या मोठ्या लोकांचा मोठेपणा कधी कधी तुमचं आयुष्य छान, सुंदर आणि सोपं करून जातं. ते आमचे मोने बाबा आहेत आणि आमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे”, असे म्हणत मयुरी देशमुखने संजय मोनेंबरोबर काम करण्याचा तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या बॉण्डिंगवर भाष्य केले आहे.
दरम्यान, ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत व ‘डिअर आजो’ या नाटकात संजय मोने व मयुरी देशमुख यांनी एकत्र काम केले आहे.