बिग बॉस मराठी ६ सुरू व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. रितेश देशमुखच यंदाचा सीझन होस्ट करणार आहे. बिग बॉस मराठीच्या ६ व्या पर्वाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये स्पर्धकांबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असतील, याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्रीने बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात पोस्ट केली आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्री काजल काटे बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी होणार अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. आता काजलने स्वतःच या चर्चांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ती बिग बॉस मराठी ६ मध्ये सहभागी होणार की नाही, तेही तिने स्पष्ट केलं आहे.
काजल काटे बिग बॉस मराठी ६ मध्ये दिसणार का?
काजल काटेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. “मी बिग बॉस मराठीमध्ये जात असल्याची चर्चा मला खूपच आवडली. शुभेच्छा देताय त्यासाठी धन्यवाद. पण मला इथे स्पष्ट करायला आवडेल की या सीझनमध्ये तरी मी बिग बॉस मराठीच्या घरात जात नाहीये. तुमचं प्रेम कायम ठेवा. भेटू लवकरच,” असं लिहून काजल काटेने ती बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी होणार नाहीये, हे स्पष्ट केलं आहे.
पाहा काजल काटेची पोस्ट
‘तुम्ही गेला असता तर बिग बॉस मराठी बघण्यासाठी कारण भेटलं असतं…’, ‘तुम्ही गेला असतात तर काय चार्म राहिला असता. पुढच्या सीझन ला या नक्की,’ ‘खरं सांगू तर बिलकुल जाऊ नकोस कधीच,’ ‘बिग बॉसमध्ये तुला पाहायला आवडेल पण आपले आवडते आणि भारी कॅरेक्टरचा अपमान झालेला आणि त्यांचा बिग बॉस वापरत करुन घेतात हे बिलकुल आवडत नाही..’ ‘बिग बॉस नाही नवीन भूमिका’, अशा कमेंट्स काजल काटेच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, काजल काटेबद्दल बोलायचं झाल्यास तिला ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने प्रार्थना बेहेरेची मैत्रीण शेफालीची भूमिका केली होती. यानंतर काजलने ‘स्टार प्रवाह’च्या ‘मुरांबा’ मालिकेतही काम केलं होतं.
काही महिन्यांपूर्वी काजल काटे तिच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत आली होती. कारण तिने वर्षभरात तब्बल १७ किलो वजन कमी केलं. काजलचं लग्न झालं असून तिच्या पतीचं नाव प्रतिक कदम आहे. प्रतिक मुंबई इंडियन्सचा फिटनेस कोच म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. काजलला वजन कमी करण्यासाठी पतीने मदत केली होती.
