‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘नशीबवान’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता लवकरच या वाहिनीवरील एक लोकप्रिय रिअॅलिटी शो प्रेक्षकांचा निरोप घेईल. ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद’च्या चौथ्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. छोट्या उस्तादांनी आपल्या भारावून टाकणाऱ्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या उस्तादांमधून ६ सर्वोत्तम स्पर्धकांनी आता महाअंतिम फेरी गाठली आहे.
अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ४’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या शनिवारी आणि रविवारी म्हणजेच २ आणि ३ मे रोजी रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यानंतर हा शो सर्वांचा निरोप घेईल. या महाअंतिम सोहळ्याचं खास आकर्षणं ठरणार आहेत जगविख्यात तालवादक तौफिक कुरेशी आणि महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख यांची उपस्थिती.
तौफिक कुरेशी यांनी आपल्या अद्वितीय तालवादनाने ‘छोटे उस्ताद’चा मंच मंत्रमुग्ध करुन टाकला आहे. खास करुन आदर्श शिंदे आणि तौफिक कुरेशी यांच्यामधील जुगलबंदी लक्षवेधी ठरणार आहे. यानिमित्ताने एक जागतिक दर्जाचा सांगीतिक अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. दुसरीकडे, रितेश देशमुखने स्पर्धकांना खास भेट देत त्यांचं कौतुक केलं आहे. या दोन्ही दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमुळे महाअंतिम सोहळ्याची रंगत द्विगुणित होणार आहे.
या दैदिप्यमान सोहळ्यात कोल्हापूरची शुभ्रा खाडे, ठाण्याचा अर्णव बोपलकर, नांदेडची विरा हाक्के, नाशिकची अस्मिता गादेकर, पुण्याचा गंधर्व चामनर आणि ईशानी हिंगे या टॉप सहा स्पर्धकांमध्ये महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यामुळे ‘सुपरस्टार’ होण्याचा मान कोण पटकवणार, या स्पर्धेत कोण विजयी होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
छोट्या उस्तादांना या पर्वात मोलाचं मार्गदर्शन केलं ते सुप्रसिद्ध अभिनेते आणि गायक सचिन पिळगांवकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत, तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे आणि सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी. या संगीत महारथींच्या सानिध्यात छोट्या उस्तादांवर गाण्याचे उत्तम संस्कार झाले. आता ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ४’चा महाअंतिम सोहळा येत्या २ आणि ३ मे रोजी रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल.
