Meera Jagannath Serial Comeback : मराठी सिनेविश्व आणि मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मीरा जगन्नाथ ही गेल्या काही काळापासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. ‘बिग बॉस मराठी’मधून घराघरांत पोहोचलेल्या मीराचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या स्पष्टवक्तेपणाची नेहमीच चर्चा होत असते. अनेक दिवसांपासून ती कोणत्याही नव्या मालिकेत किंवा प्रोजेक्टमध्ये दिसली नसल्याने ती सध्या काय करत आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आता मनोरंजन विश्वापासून दूर राहण्यामागचे कारण आणि भविष्यात कोणत्या प्रकारच्या भूमिका साकारण्याची इच्छा आहे, याबाबत मीराने तिचे स्पष्ट मत मांडले आहे.

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मीरा जगन्नाथ हिने मालिकांमध्ये काम करणे बंद का केले याबद्दल खुलासा केला आहे. मीराने यापूर्वी ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत मोमोची भूमिका साकारली होती. पण, ‘बिग बॉस मराठी सीझन ३’मध्ये सामील झाल्यानंतर मीरा घराघरांत ओळखली जाऊ लागली. काही मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारलेली मीरा या मनोरंजन विश्वापासून लांब असून खूप दिवसांनी तिने माईक वापरला असल्याचेदेखील तिने सांगितले. मीरा म्हणाली, “मालिकांसाठी अजूनही फोन येत असतात. दोन दिवसांपूर्वी कॉल येऊन गेला, पण एका कारणासाठी मी काम करणे सोडले होते किंवा मालिकांमधील भूमिका स्वीकारत नव्हते.”

एखादी चांगली भूमिका असेल तरच – मीरा जगन्नाथ

मीरा जगन्नाथ हिने नुकतेच मुंबईमध्ये घर घेतले आहे. याबाबत ती पुढे म्हणाली, घराची खूप कामे होती. खूप काही गोष्टीचे मॅनेजमेंट आणि तयारी करावी लागली, यामुळे मालिकांसाठी पूर्ण वेळ देता येत नव्हता, त्यामुळे मी चार वेगळी कामे करू लागले. इतर कामांमधूनही पैसे मिळत आहेत. घराचे हप्ते वगैरे भरायचे आहेत आणि माझी बाकीची कामेसुद्धा सुरू आहेत. पण, एखादी चांगली भूमिका असेल तरच मी मालिकांमध्ये काम करेन.” वेळ मॅनेज करण्यासाठी चार वेगवेगळी कामे करून घरासाठी वेळ देत असल्याचे मीरा जगन्नाथने सांगितले आहे.

मालिकांमधील भूमिकांबाबत मीरा जगन्नाथ म्हणाली, “यापुढे एक चांगली भूमिका हवी आहे. चुळबुळी मुलगी वगैरे चालेल, पण ती वेंधळीच आहे अशा भूमिका नकोय. खलनायिकेच्या भूमिका करायला हरकत नाहीये, कारण त्यामुळेच लोक मला ओळखतात. पण, आता एक प्रभावी आणि खंबीर भूमिका असली पाहिजे. जेव्हा तशी भूमिका मिळेल तेव्हाच मी मालिकांसाठी होकार देईन, त्यामुळे यापुढे जेव्हा टीव्हीवर येईन तेव्हा एक स्ट्राँग भूमिका असेल तेव्हाच येईन; पण नक्कीच येईन.”

मीरा जगन्नाथने ‘या’ मालिका व सिनेमांमध्ये केले काम

मीरा जगन्नाथ हिने काही चित्रपटांमध्ये व मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. तसेच, ‘इंदुरी इश्क’मध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच, ‘येरे येरे पैसा ३’, ‘इलू इलू १९९८’ या सिनेमांत मीरा जगन्नाथ प्रभावी भूमिकेत दिसली होती. मालिका, रिअॅलिटी शो आणि चित्रपट यांबरोबरच अभिनेत्रीने काही म्युझिक व्हिडीओंमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘जीव रंगलाय गो’, ‘जोडी दोघां’ची यांमध्ये ती दिसली होती.