Meera Jagannath shares her Mumbai Metro experience:  अभिनेत्री मीरा जगन्नाथने विविध मालिका, तसेच चित्रपटांमधून तिची ओळख निर्माण केली आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘ठरलं तर मग’, तसेच ‘बिग बॉस मराठी’ अशा मालिका व टीव्ही रिअ‍ॅलिटी शोसाठी मीरा जगन्नाथ ओळखली जाते. ती चित्रपटांतदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसते. अभिनयाबरोबरच अभिनेत्री तिच्या परखड वक्तव्यासाठीही ओळखली जाते.

मीरा सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. ती सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करते. तिचे लूक लक्ष वेधून घेणारे असतात. आता मात्र तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एक पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

“मी मुंबई मेट्रो…”

मीराने काही फोटो शेअर करत लिहिले, “काल माझा दिवस खूपच छान गेला. मला काल दादरला जायचं होतं. पण, ट्रॅफिक इतकं जास्त होतं की, मी विचार केला की, चला आज मेट्रोने जाऊया. तसेही मला नवीन मेट्रोने प्रवास करायचाच होता आणि काल तो योग आला.”

तिने पुढे लिहिले, “मी मुंबई मेट्रो लाईन ३ने प्रवास केला. जसं मी स्टेशनच्या आत गेले, तसं मला खूपच भारी वाटलं. मी जेव्हा परदेशात फिरायला जाते, तेव्हा बहुतेक वेळा मेट्रोच वापरते. कारण- ती सोपी असते, सगळं स्पष्ट लिहिलेलं असतं आणि प्रवासही स्वस्त असतो. मला अगदी तसाच अनुभव मुंबईमध्ये आला.”

“स्टेशन खूप नीट, स्वच्छ आणि व्यवस्थित आहे. सगळे नकाशे इतके स्पष्ट आहेत की, कोणाला काही विचारायची गरजच पडत नाही. सिक्युरिटी इतकी चांगली आहे की, कधी कधी परदेशातही एवढी सिक्युरिटी दिसत नाही.”

पुढे तिने लिहिले, “लोकांना फक्त माझी एक छोटीशी विनंती आहे. तिकीट फाडून तिथेच फेकू नका, थुंकू नका. सरकार आपल्यासाठी, आपल्या सुविधांसाठी इतक्या चांगल्या गोष्टी करत आहे, तर आपणही त्याची काळजी घेऊया. आपला देश, आपली मुंबई, आपली जबाबदारी आहे.”

मीराने ही पोस्ट लिहिताना सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच मेट्रो स्टेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी छान दिसत आहेस, अशा कमेंट्स केल्या आहेत. तसेच, अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे, तर येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. तसेच, इंदुरी इश्कमध्येदेखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

तसेच, येरे येरे पैसा ३, इलू इलू १९९८ या सिनेमांत मीरा जगन्नाथ महत्त्वाच्या भूमिकांत दिसली होती. मालिका, रिअॅलिटी शो आणि चित्रपट यांबरोबरच अभिनेत्रीने काही म्युझिक व्हिडीओंमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. जीव रंगलाय गो, जोडी दोघांची यांमध्ये ती दिसली होती.

आता आगामी काळात ती कोणत्या भूमिकेतून, कोणत्या प्रकल्पामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.