Meera Welankar on Mukta Barve: अभिनेत्री मुक्ता बर्वे लवकरच ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुक्ती आणि तिची टीम या नाटकाचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. पुन्हा नक्की भेटू या नाटकाचे दिग्दर्शन मीरा वेलणकर यांनी केले आहे.

“ती स्वत:ला तसं वलय घेऊन…”

आता मीरा वेलणकर यांनी मराठी बातमीवालाशी संवाद साधला. यावेळी त्यांना विचारण्यात आले की तुम्ही दिग्दर्शित करत असलेल्या पहिल्याच नाटकात मुक्ता बर्वेसारखी अभिनेत्री आहे. द मुक्ता बरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे? यावर मीरा वेलणकर म्हणाल्या, “द मुक्ता बर्वे असा जर तिचा उल्लेख होतोय. तर, जगामध्ये विविध स्तरावर तिचा हा उल्लेख होतोय. ती स्वत:ला तसं वलय घेऊन वावरताना मी बघितलेलं नाहीये.”

पुढे त्या म्हणाल्या, “रिहर्सल हॉलमध्ये येताना तिने कधीच ते वलय तिच्याबरोबर आणलं नाही. एक अभिनेत्री म्हणून स्क्रीप्टमध्ये काय आहे, भूमिका काय आहे, यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून, सूचना घेऊन, विविध प्रयोग करून आता ती भूमिका साकारण्यासाठी तयार होत आहे. ही प्रोसेस बघता येणं, हे माझ्यासारख्या दिग्दर्शिकेसाठी अत्यंत मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मुक्ता बर्वेला एक कलाकार म्हणून मी पाहिलं आहे.”

पुन्हा नक्की भेटू या नाटकाबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये मुक्ताबरोबरच प्रियदर्शन जाधव, अंशुमन विचारे आणि आरती वडगबाळकर हे कलाकार दिसणार आहेत. २३ ऑक्टोबरपासून हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, मुक्ताने आतापर्यंत फक्त सिनेमाच नाही तर नाटक व मालिकांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता तिच्या या नवीन नाटकातील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.