Megha Dhade Talks About Bigg Boss Hindi experience : मेघा धाडे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक कलाकृतींमध्ये काम केलं आहे. पण, ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली ते ‘बिग बॉस मराठी’मुळेच. मेघाने ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात सहभाग घेतला होता आणि ती या पर्वाची विजेती झाली होती.
मेघाला या कार्यक्रमामुळे खूप लोकप्रियता मिळाली आणि यामधूनच ती घराघरात पोहोचली. याबद्दल ती स्वत: अनेकदा बोलताना दिसते. ‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यानंतर अभिनेत्रीने हिंदी ‘बिग बॉस’ सीझन १२मध्ये सहभाग घेतला होता. अशातच आता तिने हिंदी व मराठी ‘बिग बॉस’मधील अनुभव सांगितला आहे. पण, यावेळी तिने हिंदी ‘बिग बॉस’मधील तिचा अनुभव फार बरा नसल्याचं म्हटलं आहे. ‘कॉकटेल स्टुडिओ’शी संवाद साधताना तिने याबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणाली सविस्तर जाणून घेऊयात…
‘बिग बॉस मराठी’मुळे मिळाली ओळख
‘बिग बॉस मराठी’बद्दल मेघा म्हणाली, “मालिका, चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर जी ओळख मिळाली नाही ती मला बिग बॉस केल्यानंतर मिळाली आणि घराघरात पोहोचले. मला लोक कलाकृतींमधील पात्रांच्या नावाने ओळखायचे पण, आता लोक मला मेघा धाडे म्हणून ओळखत आहेत. त्या शोने मला मेघा धाडे ही ओळख दिली.”
हिंदी ‘बिग बॉस’मध्ये आला वाईट अनुभव
मेघाला हिंदी ‘बिग बॉस’बद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “दोन्ही खूप वेगळे शो आहेत. मराठी बिग बॉस करताना जो आनंद झाला तो तिथे झाला नाही. कारण – मराठीत जे स्पर्धक होते त्यांना मी ओळखत होते. माझ्या पर्वातील सगळ्यांबरोबर मी काम केलं होतं. त्यांचा प्रवास मला माहीत होता. त्यामुळे कधी आता जसं होतं तशी भांडणं झाली नाही. फक्त टास्कदरम्यान आमची भांडणं व्हायची. त्यानंतर आम्ही भांडायचो नाही. पण, इथे तर टास्क करताना भांडत नाही पण, त्यानंतर खूप धिंगाणा घालतात. हिंदी बिग बॉसमध्ये चोवीस तास भांडणं सुरू असतात. कोणी कोणाला ओळखत नसतं. मी हिंदीत काम केलंय. काही लोकांना ओळखत होते.”
मेघा पुढे म्हणाली, “पण, बाकी जे या क्षेत्रातील नव्हते त्यांच्याबरोबर जमवून घेणं कठीण गेलं. कारण – ते ज्या भागातून आले होते जिथे बायकांना दुय्यम स्थान दिलं जातं. त्यामुळे ती गोष्ट मला खटकली. त्यात मी मराठी बिग बॉसची विजेती आहे याबद्दल त्यांना गमंत वाटायची. हसू यायचं आणि मला त्या गोष्टीचा खूप राग यायचा मग मी त्यांना सडेतोड उत्तर द्यायचे. माझी तिथे खूप भांडणं झाली. आजही मराठी बिग बॉसच्याच आठवणी माझ्याकडे जास्त आहेत. मी माझा हिंदीतील सीझन पाहिलासुद्धा नाही. मला तो बघावासं वाटलंच नाही.”
