Megha Dhade shares photos with Sharmishtha Raut and Sai Lokur: सावळ्याची जणू सावली या मालिकेत भैरवी या भूमिकेतून अभिनेत्री मेघा धाडे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील तिची भूमिका जरी नकारात्मक असली तरी तिच्या या भूमिकेवर प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम असल्याचे पाहायला मिळत आहे.
सावलीला सतत त्रास देणारी, तिच्याविरुद्ध कट-कारस्थाने करणारी, तसेच सारंग व सावलीला दूर करण्यासाठी सतत प्रयत्न करणारी भैरवी प्रेक्षकांना आवडते. मेघा धाडेला या भूमिकेतून प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे.
आता मात्र मेघा धाडे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत लक्ष वेधून घेतले आहे. आता तिची नेमकी पोस्ट काय आणि फोटोत तिच्याबरोबर आणखी कोण आहे, ते जाणून घेऊ…
“मी माझ्या घरून बिग बॉस मराठी सीझन १ च्या प्रवासासाठी….”
मेघा धाडेने शर्मिष्ठा राऊत आणि सई लोकूर यांच्याबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिघीही खूप सुंदर दिसत आहेत. विविध पोज देत त्यांनी सुंदर फोटो काढले आहेत. शर्मिष्ठा राऊत व सई लोकूर यांच्याबरोबरचे हे फोटो शेअर करीत मेघा धाडेने लिहिले, “१२ एप्रिल २०१८ याच दिवशी मी माझ्या घरून बिग बॉस मराठी सीझन १ च्या प्रवासासाठी निघाले होते. या प्रवासाला निघाले तेव्हा स्वप्नातही विचार केला नव्हता की, याच वळणावर मला अशा दोन गोड मुली मला भेटतील, ज्या माझ्यासारख्या थोड्याशा वेड्या आणि खूप जिद्दी आहेत.”
पुढे तिने लिहिले, “धडपडणाऱ्या, उत्साही अशा या गोड मुली सई आणि शमा ज्या मला या वळणावर भेटल्या आणि त्यानंतरच्या पुढच्या प्रवासात माझ्याबरोबर कायमच्या राहिल्या. त्या यापुढेही कायम आयुष्यभर राहतील. मुलींनो, माझं तुमच्यावर प्रेम आहे. बिग बॉस तुम्हाला खूप प्रेम. या एंजल्सना माझ्या आयुष्यात पाठविण्यासाठी खूप धन्यवाद”, असे म्हणत मेघाने तिच्या भावना व्यक्त केल्या.
नेटकरी म्हणाले…
मेघाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत मेघा, शर्मिष्ठा व सईच्या मैत्रीचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले, “खूप गोड”, दुसऱ्या एकाने लिहिले, “रियुनियन”, एकाने लिहिले, “सई, मेघा, शमा आणि पुष्कर”, आणखी एकाने लिहिले,”माझा आवडता बिग बॉसचा सीझन”, एकाने लिहिले, “बिग बॉस मराठी १ मधील माझे आवडते स्पर्धक”, दुसऱ्या एकाने लिहिले, “बिग बॉसचा पहिला सीझन खूप बेस्ट होता. मैत्री असो वा राडे असो, सर्वच मस्त होतं”, एकाने लिहिले, “तुमच्यासारखा सीझन पुन्हा होणार नाही”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर, अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.



दरम्यान, मेघा धाडे, शर्मिष्ठा राऊत, सई लोकूर, तसेच पुष्कर जोग यांच्या मैत्रीचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते. बिग बॉस मराठी सीझन १ ची विजेती मेघा धाडे ठरली होती.
