Megha Dhade on Savlyachi Janu Savali Co Actors: मालिका किंवा चित्रपटांमध्ये काही पात्रांमध्ये मैत्री दिसते, काही पात्रे नकारात्मक दिसतात तर काही सकारात्मक दिसतात. त्यांच्यातील नाते, मैत्री, शत्रुत्व अशा सर्व गोष्टींमुळे या कलाकृती लोकप्रिय ठरतात.

दररोज प्रदर्शित होणाऱ्या मालिकांमधून अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांच्यातील नाते पडद्यावर दिसते, तसेच खऱ्या आयुष्यात असते का असा प्रश्न अनेकांना पडतो. पडद्यामागे त्यांचे नाते कसे असते हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

आता ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत भैरवी वझे व सावली यांच्यात कायमच तणावपूर्ण नाते असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांच्यातील शत्रुत्वही दिसले आहे. आता खऱ्या आयुष्यात त्यांच्यातील नाते कसे आहे, हे अभिनेत्रीनेच सांगितले आहे.

अभिनत्री मेघा धाडेने सेट सिक्रेट्स या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या करिअर तसेच खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील आठवणी सांगितल्या. तसेच, बिग बॉस मराठीने तिला तिची नवीन ओळख मिळवून दिली, असे मेघा धाडे म्हणाली. तसेच, मराठी बिग बॉस आणि हिंदी बिग बॉसमधील अनुभव वेगळा होता, असेही अभिनेत्रीने सांगितले.

“ती माझी आधीपासून मैत्रीण…”

याबरोबरच सध्या काम करत असलेल्या ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कोणत्या सह कलाकारांबरोबर चांगली मैत्री आहे? यावर मेघा धाडे म्हणाली, “मालिकेतील सावली आणि तारा म्हणजेच प्राप्ती व भाग्यश्री या माझ्या जवळच्या आहेत, त्या माझ्या जीव की प्राण आहेत.”

पुढे ती म्हणाली, “सेटवर तशी सगळ्यांशीच मैत्री छान झाली आहे. मालिकेतील अमृता म्हणजे मानसी, ती माझी आधीपासून मैत्रीण आहे. सुलेखा ताईला तर आधीपासूनच ओळखत होते. इथं येऊन एकमेकींशी छान गप्पा मारता आल्या, छान बोलता आलं, ओळखता आलं; तिच्याशी छान मैत्री झाली आहे.”

मेघा पुढे म्हणाली, “मालिकेतील जयंती, ती खूप गोड मुलगी आहे. उत्तम अभिनेत्री आहे. मी तिच्या अभिनयाच्या प्रेमात आहे. मला तिचं काम प्रचंड आवडतं. तर या सगळ्या मैत्रिणी आहेत. याबरोबरच, मालिकेतील सारंग म्हणजेच साईंकित कामत आहे. तो आमच्याबरोबर डबा खातो, तर मालिकेच्या निमित्ताने या सगळ्यांबरोबर मैत्री झाली आहे. पण, सावली आणि तारा त्या माझ्यासाठी खास आहेत आणि पुढेही राहतील”, असे म्हणत मेघा धाडेने सावळ्याची जणू सावली मालिकेतील कलाकारांबरोबर कसे नाते आहे हे सांगितले.