Megha Ghadge Ashok Saraf Romantic Scene Experience: मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ हे त्यांच्या सहज आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांच्याबरोबर एकदा तरी काम करता यावं अशी कलाकारांची इच्छा असते. असाच एक अनुभव नृत्यांगना व अभिनेत्री मेघा घाडगेने शेअर केला आहे. अशोक सराफ यांच्याबरोबर रोमँटिक सीन कसा शूट केला याबद्दल मेघा घाडगेने सांगितले आहे.

मेघा घाडगेने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कलाविश्वातील अनुभव आणि आठवणी शेअर केल्या आहेत. यावेळी तिने अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याचा आवर्जून उल्लेख केला. पण, अशोक सराफ यांच्याबरोबर एका मालिकेसाठी रोमँटिक सीन शूट करताना तिला आलेले दडपण आणि त्यावेळी अशोक मामांनी काढलेली समूजत याबद्दल सांगितले. तसेच यावेळी निवेदिता सराफसुद्धा समोर असल्याचे मेघा घाडगेने सांगितले.

अशोक सराफांबाबत काय म्हणाली मेघा घाडगे?

मेघा घाडगे म्हणाली, अशोक सराफ यांच्याबरोबर मला एक भूमिका करायला मिळाली. त्यावेळी मला अशोकमामांबरोबर प्रेमाचा आणि रोमँटिक सीन कसा करावा, असा प्रश्न पडला होता. त्यावेळी निवेदिता सराफसुद्धा समोर होत्या.”

पुढे ती म्हणाली, “अशोक सराफ व निवेदिता सराफ यांची एक मालिका होती. त्यांच्या मालिकेमध्ये मला पाहुणी कलाकार म्हणून बोलावण्यात आलं होतं. अगदी दोन दिवसांचं काम होतं. त्यांच्या मालिकेमध्ये लावणी कलावंत म्हणून मला बोलावण्यात आलं होतं. अशोक सराफ यांना समोर बघूनच मी स्वतःलाच म्हणाले, ‘मेघा, तू खूप मोठं पुण्य केलंस काहीतरी, म्हणून अशा लोकांबरोबर काम करता येत आहे.'”

अशोक सराफांनी मेघा घाडगेला समजावला सीन

    मेघा घाडगेने पुढे अशोक सराफ यांनी पूर्ण सीन समजून सांगितल्याचे सांगितले. ती म्हणाली, “त्यांच्याबरोबर सीन करताना, त्यांनी आधी मला शांत केलं आणि सीन कसा करणार आहे याबद्दल मुद्देसूदपणे सांगितले. यावेळी अशोक मामा म्हणाले, ‘तुझा बाज तू सोडायचा नाहीस, तू एक लावणी कलावंत आहेस, तुला त्याप्रमाणे बोलावे लागेल, तर तसं बिनधास्त बोल,’ असं सांगितलं होतं.”

    पुढे ती म्हणाली, “या सीनवेळी निवेदिता सराफसुद्धा तिथेच समोर होत्या. त्या तर फार दिग्गज कलाकार आहेत. त्या काळामधील ते गाजलेले कलावंत आहेत आणि त्यांच्यासमोर मला काम करावं लागतंय, त्यावेळी माझं काय झालं असेल? तो सीन तर अप्रतिम आणि खूप छान झाला.”

    मेघा घाडगेने सांगितल्या लता मंगेशकर यांच्या आठवणी

    पुढे मेघा घाडगेने आयुष्यात मोठ्या गोष्टी केल्या, पण लोकांपर्यंत पोहचल्या नाहीत, अशी खंत व्यक्त केली. ती म्हणाली, “खूप मोठी माणसं माझ्या आयुष्यात मी पाहिली. मी मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या, पण त्या अजूनही लोकांपर्यंत नीट पोहोचल्या नाहीत. मला लता मंगेशकर यांचा आवाज लाभला. ‘मैत्र जीवाचे’ हा गजेंद्र अहिरेचा अल्बम केला. त्यात माझी दोन गाणी होती आणि त्यामध्ये लता मंगेशकर यांचा आवाज मला लाभला, मला अभिमानाने ही गोष्ट सांगता येते. लोकांना ते फारसे माहीत नाहीत, पण माझं एक स्वप्न सार्थकी लागल्यासारखं झालं.”