Meghana Erande : यंदाच्या गणेशोत्सवात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तर, काही कलाकारांनी सेटवर बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं आहे. ‘झी मराठी’च्या ‘सनई चौघडे’ मालिकेची टीम तर खास गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात पोहोचली होती. हा खास अनुभव अभिनेत्री मेघना एरंडेने सांगितला आहे.
मी कधीच कोकणात गेले नव्हते…
मेघनाला यंदा ‘सनई चौघडे’ मालिकेच्या निमित्ताने परब कुटुंबाचा कोकणातील गणेशोत्सव अनुभवता आला. याबद्दल अभिनेत्री सांगते, “यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूपच स्पेशल होता कारण, मालिकेतील आमचं परब कुटुंब या शूटिंगसाठी खास कोकणात पोहोचलं होतं. अर्थात, सणाच्या आधीच आमचं शूटिंग पूर्ण झालं होतं. पण, एकंदर कोकणातील गणेशोत्सव कसा असतो हे यानिमित्ताने मला अनुभवता आलं…याआधी मी कधीच कोकणात गेले नव्हते. ‘सनई चौघडे’मध्ये ज्या प्रकारे हा सगळा गणेशोत्सव पुन्हा उभा केला गेला, ते खूप सुंदर होतं. हरतालिकेपासून गौरीपर्यंत सगळंच त्यात आहे. तुम्ही ते मालिकेत प्रत्यक्ष बघालच. सुरुवातीलाच जेव्हा ‘सनई चौघडे’च्या टीमला गणेशगल्लीच्या राजाच्या पाद्यपूजनासाठी नेण्यात आलं, तेव्हापासूनच आमच्या सगळ्यांचा गणेशोत्सव सुरू झाला. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खऱ्या अर्थाने खूप स्पेशल आहे.”
कठीण प्रसंगात नेहमी मार्ग दाखवला…
मेघना पुढे म्हणाली, “बाप्पांनी मला नेहमीच सगळ्या कठीण प्रसंगातून बाहेर काढलं आहे. स्वामी आणि बाप्पा हे माझे दोन इष्ट आहेत. लहानपणापासूनच ‘गणपती बाप्पा मोरया’ असं म्हटल्याशिवाय मी कुठल्याही प्रोजेक्टची सुरुवात कधीच केलेली नाही. आमचं शूटिंग पॅकअप होतं तेव्हाही आम्ही ‘गणपती बाप्पा मोरया’ असंच म्हणतो. माझा अनुभव आहे की बाप्पा सतत माझ्यासोबत असतात. पदोपदी मला त्याची प्रचिती मिळत असते की, ते माझी मदत करत आहेत. त्यांनी मला अनेक संकटातून बाहेर काढलं आहे. २०१० मध्ये माझं लग्न झालं. त्याआधी मी दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात होते. पण लग्नानंतर पुन्हा त्याच्या दर्शनाला जाण्याचा योग आला नाही. यावर्षी मात्र ‘सनई चौघडे’च्या टीमसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायला मला नक्की आवडेल. २०१० पासून पवईमध्ये जे गणपती बसतात, त्यांच्या दर्शनाला मी माझ्या मुलीला घेऊन न चुकता जाते. गणपतीच्या दर्शनासाठी मला एक वेगळाच जोश, नवी चेतना आणि ऊर्जा मिळते.”
खास आठवण…
“माझी स्पेशल आठवण सांगायची झाली तर मला असं वाटतं की, गणपती बाप्पा माझ्या मनातलं सगळं नक्की ऐकतात आणि ते पूर्णही करतात. आमच्या शेजारी आठवले आजी होत्या. त्या सिद्धिविनायक मंदिरात मुख्य आचारी होत्या. त्या रोज माझ्यासाठी सिद्धिविनायकाचा गजरा आणि प्रसादातला मोदक आणायच्या. त्यामुळे पहिली ते दहावीपर्यंत मी रोज केसांमध्ये सिद्धिविनायकाचा गजरा घालून शाळेत जायचे. त्यामुळे मला वाटतं की मी खूप भाग्यवान आहे आणि अशीच भाग्यवान राहीन. माझ्या मुलीचा जन्मही मंगळवारचा आहे. माझं आणि बाप्पाचं एक वेगळं, निरागस, निखळ आणि नावखंळ असं मैत्रीचं नातं आहे आणि ते कायम असंच राहील. गणपती बाप्पा मोरया!” अशा भावना मेघनाने व्यक्त केल्या आहेत.
