‘सनई चौघडे’ मालिकेतील पमा म्हणजे प्रमिला परब आता घराघरांत लोकप्रिय झाली आहे. तिचा साधाभोळा स्वभाव, मुलींवरची माया, सर्वाप्रती असणारी काळजी या गोष्टी आता प्रेक्षकांनाही भावतात. ‘सनई चौघडे’मध्ये पमाचा टिफिन व्यवसाय आहे. तसेच ती बाराही महिने फराळ करत असते असं मालिकेत पाहायला मिळतं. सेटवरच्या शूटिंगचा हाच खास अनुभव अभिनेत्री मेघना एरंडेने सांगितला आहे.

मेघना एरंडे सांगते, “आमच्या घरी आई आणि सासूबाई दोघीही सुगरण आहेत. त्यामुळे स्वयंपाक आणि फराळाचे बहुतेक पदार्थ त्या दोघीच बनवतात. मला फक्त चव बघायला आणि क्वालिटी चेक करायला बसवलं जातं. त्यामुळे मी फार काही करत नाही. पण मागच्या दिवाळीत मला लक्षात आलं की, मी चांगल्या करंज्या करू शकते. त्यामुळे मग बाकीचा फराळ आई आणि सासूबाई करतात.”

“मालिकेतलं दिवाळी सेलिब्रेशन अजून झालेलं नाही, पण पमा परबचा ( शरुची आई ) व्यवसाय असल्यामुळे मालिकेत सतत चकल्या, चिवडा, लाडू असे फराळाचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू असते. सगळा स्वयंपाक आणि फराळ पमा एकटीच बनवत असते. वेगवेगळ्या मठांमध्ये जाऊन स्वयंपाक करणं, हेही तिच्या आयुष्याचा भाग आहे. त्यामुळे परब कुटुंबात फराळ नेहमीच असतो.”

सेटवर चकल्या तळल्या, चिवडा बनवला…

“मी मालिकेत चकल्या तळल्याही आहेत. मोठं भांडं, त्यात उकळतं तेल पाहून मला सुरुवातीला खूप भीती वाटायची. पण आमचे दिग्दर्शक राजू सर म्हणाले, ‘काही नाही, स्वामींचं नाव घे आणि कर. तू चांगलं करशील.’ त्यानंतर तो शॉटही छान झाला. चकल्या बनवण्यासाठी लागणारे साचे वगैरे सगळं आणलं होतं. आम्ही १०-१२ किलोचा चिवडाही बनवला आहे. सगळे सेटवर मदत करतात, पण अंतिम शॉट्स माझेच असतात. पमामुळे मला मालिकेत फराळ बनवण्याचा अनुभव मिळतो आणि त्यात मला खूप मजा येते.”

“खरं सांगायचं तर दिवाळी मला घरच्यांसोबत सुट्टी घालवून, छान नटून-थटून, घरीच आनंदात साजरी करायला आवडते. माझ्या मते, दिवाळी हा एकमेव सण आहे जो आपल्या पाचही इंद्रियांना सुखावतो. सगळीकडे दरवळणारा सुगंध, रांगोळीला स्पर्श करण्याचा आनंद, दिवाळीच्या गाण्यांचे आणि फटाक्यांचे आवाज, डोळ्यांना सुखावणारी रोषणाई, या सगळ्यांमुळे दिवाळीचा अनुभव खास बनतो.” असं मेघनाने सांगितलं.