Meghna Erande on Aditi Sarangdhar: ‘सनई चौघडे’ ही मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहे. मालिकेतील जवळजवळ सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अभिनेत्री मेघना एरंडेने या मालिकेत पमा म्हणजेच प्रमिला ही भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री अदिती सारंगधरने तेजस्विनी खानोलकर ही भूमिका साकारली आहे.

मालिकेत पमा व तेजस्विनी यांच्यात सतत कुरबुरी पाहायला मिळतात. त्यांच्यात वादही झाले आहेत. मात्र खऱ्या आयुष्यात मेघना व आदिती मैत्रीणी आहेत. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांच्यात चांगली मैत्री होती, असे मेघनाने एका मुलाखतीत सांगितले आहे.

मेघना एरंडेने मराठी सिरिअल्स ऑफिशिअलशी संवाद साधला. आदितीबरोबरच्या मैत्रीबद्दल ती म्हणाली, “अदिती आणि मी अकरावीपासून पदवीपर्यंत एकाच बॅचमध्ये होतो. ती रुईया कॉलेजमध्ये होती आणि मी रुपारेलमध्ये होते. एकांकिका स्पर्धांमुळे आमची नेहमी भेट व्हायची. त्या काळात आमच्यात कधीच स्पर्धा नव्हती. आम्ही एकमेकींच्या कामाचं मनापासून कौतुक करायचो. कॉलेज संपल्यानंतर मात्र आयुष्याच्या धावपळीत आमचा संपर्क फक्त ‘हाय-हॅलो’पुरता राहिला.”

“आमच्या गप्पांमध्ये अध्यात्मालाही विशेष स्थान…”

पुढे ती म्हणाली, “‘सनई चौघडे’मुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मालिकेत आमची पात्रं एकमेकींच्या अगदी विरुद्ध आहेत. पमा तेजस्विनीला घाबरते, तर तेजस्विनीला पमाची उपस्थितीही आवडत नाही. पण खऱ्या आयुष्यात चित्र अगदी उलट आहे. आमचे मेकअप रूम शेजारी आहेत. आम्ही एकत्र जेवतो, कॉफी पितो, गाणी ऐकतो, व्हिडिओ पाहतो आणि खूप गप्पा मारतो. अदितीला माझ्या डब्यात थोड्या गोडसर भाज्या असतात त्या आवडतात. ती सुद्धा माझ्यासाठी काही खास पदार्थ बनवले कि घेऊन येते. आम्ही राजगिरा लाडू खातो. मी तिला वॉटर सिपर दिला होता, तर तिने मला डिझायनर बॅग दिली होती. ज्यावर खरे घुंगरू विणले आहेत. खूप सुंदर बॅग तिने भेट दिली आहे.”

ती असेही म्हणाली, “माझ्या मकेअप रूममध्ये स्वामींची मूर्ती आहे. ती हमखास येऊन नमस्कार करते. आमच्या गप्पांमध्ये अध्यात्मालाही विशेष स्थान असतं. ती रेकी करते, तर मी प्राणिक हीलिंग करते. त्यावर आम्ही अनेकदा चर्चा करतो. आम्हा दोघींनाही संगीताची खूप आवड आहे. आमचे स्वभाव मात्र खूप वेगळे आहेत. अदिती खूप ठाम, उत्साही आणि बिनधास्त, रॉकस्टार आहे. तर मी कमी बोलणारी आहे. पण कदाचित हाच आमच्या मैत्रीचा सर्वात मोठा गुण आहे. आम्ही एकमेकींना समजून घेतो, एकमेकींची साथ देतो आणि मनातल्या अनेक गोष्टी एकमेकींबरोबर शेअर करतो. सेटवर तिचे सीन नसले की तिची खूप आठवण येते. ती आली की वातावरणच आनंदी होतं. ‘सनई चौघडे’मुळे मला माझी जुनी मैत्रीण पुन्हा मिळाली. ही मैत्री आजही तितकीच सुंदर, प्रामाणिक आणि घट्ट आहे.”

दरम्यान, मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येतात. आता आगामी काळात मालिकेत काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.