Meghna Erande And Tejashri Pradhan Video: सध्या अनेक नवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. झी मराठी, कलर्स मराठी, स्टार प्रवाह या विविध वाहिन्यांवरती वेगवेगळे विषय असलेल्या मालिका लवकरच प्रदर्शित होणार आहेत. काही दिवसांपासून विविध प्रोमो लक्ष वेधून घेत आहेत. त्यामध्ये झी मराठी वाहिनीवरील सनई चौघडे ही एक मालिका आहे.

सनई चौघडे या मालिकेचे काही प्रोमो लक्ष वेधून घेत आहेत. त्यामध्ये मेघना एरंडे प्रमुख भूमिकेत दिसणार असून, अनेक वर्षांनंतर तिने टेलिव्हिजनवर पुनरागमन केले आहे. तिला पुन्हा एकाद टीव्हीवर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशातच मेघनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मेघना एरंडेने गायलं लोकप्रिय गाणं

पुष्पगंध फिल्म कंपनीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. मेघना एरंडे वीण दोघांतली ही तुटेना मालिकेच्या सेटवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. तिथे ती लहान मुलाच्या आवाजात द कपीकेक (The Cuppycake) हे गाणे म्हणत आहे.

‘वीण दोघांतली ही तुटेना’मधील कलाकार तिथे उभे असून त्यांच्या चेहऱ्यावर तिच्याबद्दलचे कौतुक दिसत आहे. हे गाणे म्हणत असताना ती तेजश्रीला बोलावते. तेजश्री हसत तिथे येते. गाण्याच्या शेवटी तेजश्री तिला गाण्यात साथ देते. त्या दोघी शेवटी एकमेकींना मिठी मारतात. मेघना लहान मुलाच्या आवाजात गोड हसताना दिसते. तसेच शेवटी सर्व जण टाळ्या वाजवत तिचे कौतुक करतात.

हा व्हिडीओ शेअर करताना, “पुष्पगंध फिल्म कंपनीच्या झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या सेटवर आपल्या लाडक्या मेघना एरंडे व तेजश्री प्रधान यांचा गोड क्षण…”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

नेटकरी म्हणाले…

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “वाह! मेघनाताई कितीही वयाने मोठी झालीस, तरीही लहानच वाटतेस”, दुसऱ्या एकाने लिहिले, “किती छान! मस्त आवाज आहे. छोट्या बाळासारखा आवाज आहे”, एकाने लिहिले, “अगं, किती गोड तायडे”, आणखी एकाने लिहिले, “खूप भारी”, एकाने लिहिले, “वाह”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

मेघना एरंडे अभिनेत्री असण्याबरोबरच एक व्हॉईस आर्टिस्टदेखील आहे. तिने आजपर्यंत विविध कार्टून कॅरॅक्टर्सना आवाज दिला आहे. शिनचान, नोडी, निंजा हातोडी, तसेच मराठीमधील डोरेमॉन अशा विविध पात्रांना तिने आवाज दिला आहे.