Marathi Celebrity Sisters : मराठी कलाविश्वातील असे अनेक कलाकार आहेत, जे खऱ्या आयुष्यात एकमेकांची सख्खी भावंडं आहेत. मृण्मयी देशपांडे-गौतमी देशपांडे, अभिषेक देशमुख-अमृता देशमुख, पुर्णिमा तळवळकर-पल्लवी वैद्य, समीधा गुरू-मृणाल देशपांडे या कलाकारांच्या जोड्या लोकप्रिय आहेत. अशीच आणखी एक मराठी अभिनेत्री बहिणींची जोडी लोकप्रिय आहे, ती म्हणजे भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते.
भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते या मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या दमदार अभिनयानं अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. दोघी बहिणींनी नाटक, मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
आपल्या अभिनयाद्वारे चर्चेत असणारी भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते ही बहिणींची जोडी सोशल मीडियावरसुद्धा तितकीच सक्रिय असते. दोघी एकमेकांबरोबरचे काही खास क्षण आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असतात.
भार्गवीबद्दल सांगायचं झालं तर, ‘अनुबंध’, ‘वहिनीसाहेब’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’, ‘मोलकरीण बाई – मोठी तिची सावली’, ‘भाग्यविधाता’ यांसारख्या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली. मोठ्या पडद्यावरही तिनं ‘संदूक’, ‘वन रूम किचन’, ‘लाल बत्ती’ यांसारख्या चित्रपटांमधून आपली छाप पाडली आहे. तसेच तिनं ‘फू बाई फू’ आणि ‘एकापेक्षा एक’ असे काही रिअॅलिटी शोसुद्धा केले आहेत.
नाटक, मालिका, सिनेमांनंतर अभिनेत्री भार्गवी चिरमुले आता यूट्यूबर म्हणूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील दिग्गजांच्या मुलाखती ती तिच्या यूट्यूब चॅनेलवर घेताना दिसते.
तसेच चैत्राली गुप्तेबद्दल सांगायचे झाले तर तिनं ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘वादळवाट’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘ऋणानुबंध’, ‘शुभं करोती’, तसेच काही दिवसांपूर्वीच ऑफ एअर झालेल्या ‘अशोक मा. मा.’ या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. मराठीसह हिंदी मालिकाविश्वातही तिनं आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ‘ये रिश्ते है प्यार के’, ‘विद्रोही’, ‘इमली’, ‘पिया अलबेला’ या हिंदी मालिकांमधून चैत्रालीनं हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मराठी आणि हिंदी मालिकांबरोबर चैत्रालीनं चित्रपटांतूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘अशी ही जमवा जमवी’, ‘झिम्मा’, ‘कनिका’, श्रीमंत दामोदर पंत’ या चित्रपटांत ती पहायला मिळाली आहे.
चैत्राली सध्या स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यात तिनं सावित्रीबाई यांच्या आईची म्हणजेच लक्ष्मीबाई ही भूमिका साकारली आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. या मालिकेत चैत्रालीबरोबर स्वप्नील राजशेखर, सविता मालपेकर, अभिषेक देशमुख व राजसी भावे यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
