Milind Gawali shares photo: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी हे अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळेदेखील अनेकदा चर्चेत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांचे अनुभव, शूटिंगदरम्यानच्या गमतीजमती, किस्से अशा अनेक गोष्टी शेअर करतात.
मिलिंद गवळींच्या जावयाला पाहिलंत का?
आता लोकप्रिय अभिनेत्री रुपाली गांगुलीच्या वाढदिवसाला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळचा अनुभव त्यांना पोस्ट शेअर करत सांगितला आहे. वाढदिवसाच्या पार्टीतील काही खास फोटो शेअर करत ते म्हणाले, “काल रूपाली गांगुली यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहारा स्टार येथे त्यांच्या पार्टीला मी आणि माझा जावई दिग्विजय कदम आम्ही दोघे गेलो. सहसा मी पार्टीला जायचं टाळतो, पण कोणी खूपच प्रेमाने, आदराने आग्रह करून आमंत्रण दिलं तर मग मी जायचं टाळतही नाही.”
पुढे त्यांनी लिहिले, “रूपाली गांगुली यांच्या आईसाहेब इतक्या गोड आणि प्रेमळ आहेत, त्या आवर्जून माझ्या सगळ्या मालिका बघतात आणि माझं पोट भरून कौतुक करत असतात. काल त्यांना भेटायचा मोहसुद्धा होताच. मी माझ्या जावयाची ओळख करून दिली तर आईसाहेब म्हणाल्या की जावयाचा आदर सत्कार केल्याशिवाय आम्ही सोडणारच नाही.”
मिलिंद गवळी यांनी पार्टीत आणखी कोण भेटले याबद्दलही लिहिले. त्यांनी लिहिले, “राजनशाही सुद्धा भेटले, माझा जावई सिरम कंपनीमध्ये कामाला आहे ही गोष्ट इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांच्या लक्षात होती. राजनजींनी मला सुमंताजी बोस जे आमच्या स्टार वाहिनीचे मुख्य आहेत, यांच्याकडे मराठी, गुजराती, बंगाली, स्टारप्लस, स्टारभारत चे मुख्य आहेत त्यांचीसुद्धा माझ्याशी ओळख करून दिली. ते मला भेटून म्हणाले की मला माहित आहे की तू मराठीमध्ये वनराज(आई कुठे काय करतेमधील अनिरुद्ध)ही भूमिका साकारली होतीस. तू उत्तम अभिनेता आहेस.” तसेच रोमेश कारलाजी आणि त्यांचे कुटुंबिय बेटले. ‘आई कुठे काय करते’चे विवेक जैन तेही भेटले.”
पुढे त्यांनी लिहिले, “हे सगळे इतके मोठे लोक आहेत जे प्रत्येकी दोनशे पाचशे कुटुंबांचे घरं चालवतात. ज्यांच्या एका शब्दावर आमच्या मालिका उभ्या राहतात. रूपाली गांगुलींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रेमळ आई, तिच्या हसतमुख पतीची भेट झाली. रूपाली गांगुली यांची ‘अनुपमा’ मालिका ही ‘आई कुठे काय करते’ वरून घेतली आहे पण ती आजही सुरू आहे, त्याचं श्रेय रूपाली गांगुली यांच्या टॅलेंट, समर्पण आणि मेहनतीला जाते. राजनशाहींसारखे निर्माते आम्हालाही लाभले होते, पण आमच्यामध्यलं समर्पण आणि मेहनत, कामाविषयीचा प्रामाणिकपणा बहुतेक कमी पडला. आज इतका चांगला, मोठा प्रोड्यूसर पुन्हा मराठी करायला तयार नाही”, असे लिहित त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, मिलिंद गवळी सध्या स्टार प्रवाह वाहिनीच्या वचन दिले तू मला या मालिकेत काम करत आहेत.
