Milind Gawali Shared A Post : मिलिंद गवळी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. मराठी मालिका, नाटक व चित्रपटांतून त्यांनी काम केलं आहे. मराठीसह त्यांनी हिंदीतही काम केलं आहे. मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी त्यामार्फत शेअर करत असतात.
मिलिंद गवळी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. किस्से, गमती-जमती सांगत असतात. अशातच आता त्यांनी काही जुने फोटो शेअर करत आठवण सांगितलं आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या साखरपुड्यादरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. मिलिंद गवळी यामधून काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात…
मिलिंद गवळी इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करत म्हणाले, “आज ३६ वर्षं पूर्ण झाली, बरोबर आजच्या दिवशी ३६ वर्षांपूर्वी माझा आणि दीपाचा साखरपुडा धुळ्यामध्ये गरुड बागेत, लक्ष्मी निवास या दीपाच्या घराच्या अंगणात पार पडला. २५ मार्च १९९० रोजी मी त्या वेळेला AIR वर प्रसारण कार्यकारीची नोकरी करत होतो. दोन दिवसांची सुट्टी काढून मी माझ्या कुटुंबाबरोबर आधी नाशिकला गेलो आणि माझे आजी आजोबा आणि २०-२५ इतर नातेवाईक यांच्याबरोबर दोन-तीन गाड्या, एक छोटी बस घेऊन धुळ्याला पोहोचलो.”
मिलिंद गवळी साखरपुड्याची आठवण सांगत पुढे म्हणाले, “ठरल्याप्रमाणे साखरपुड्याचा, सुपारी फोडायचा कार्यक्रम झाला, मग जेवणाच्या पंगती बसल्या. मी उत्सवमूर्ती होतो. त्यामुळे माझं ताट छान सजवून, रांगोळी काढून मला वाढलं होतं, खूप जण आग्रह करून वाढत होते. त्यात एक त्यांच्यातला लांबचा नातेवाईक माझ्याकडे गुलाबजाम घेऊन आला आणि मला भरवायला लागला, मी त्याला नम्रपणे सांगितलं की, मला फार गोड आवडत नाही, मग तर त्याचा आग्रह जास्तच वाढला; पण मी नाही, नाहीच म्हणत होतो. तो काही थांबायला तयार नव्हता, तुम्ही मुंबईची मंडळी जरा नाजूकच असतात. अहो दाजी, तुम्ही एक गुलाबजाम खा, मी दोन खाईन, तुम्ही दोन खाल्ले, तर मी चार, तुम्ही जितके खाल, त्याच्या दुप्पट मी खाईन, असं म्हणाला. त्यावर मी म्हटलं की, तू दुप्पट खाणार असशील तर मग मी खातो गुलाबजामचं पातेलच मी मागून घेतलं, मी एक खाल्ला, त्या गृहस्थाने दोन खाल्ले, मग मी दोन खाल्ले, त्यांनी चार खाल्ले. एकामागे एक असे माझे १२ झाले. त्याने २४ खाल्ल्यानंतर मात्र तो भंजाळून गेला होता, त्याच्या घशापर्यंत आलं होतं, मग तो गृहस्थ म्हणाला दाजी मला बस झालं. आता माझ्याऐवजी दुसरा कोणीतरी खाईल.”
मिलिंद गवळी पुढे लिहितात “मीपण हट्टाला पेटलो होतो. म्हटलं नाही, आता मी जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तू दुप्पट खात राहायचे. तितक्यात वडीलधारी मंडळी आली आणि हे सगळं तिथेच थांबलं.या ३६ वर्षांमध्ये त्या गृहस्थाला भेटायची माझी खूप इच्छा होती; पण त्याची आणि माझी पुन्हा भेट कधीच झाली नाही, तो नक्कीच म्हणाला असेल हा दाजी, म्हणजे दीपाचा होणारा नवरा, नक्कीच सटकीला आहे.दीपा २१-२२ वर्षाची, मी २२-२३ वर्षाचा, खर तर आम्ही दोघेही अल्लडच होतो, आई-वडिलांचा आम्हाला खूपच पाठिंबा होता. ती तरी फार लवकर समजूतदार झाली; मी मात्र अजूनही तितका समजूतदार नाहीये . माझ्या संसाराचा गाडा इतकी वर्षं सुरळीत चालला. त्याचं कारण दीपाचा समजूतदारपणा, काटकसरीपणा, घरासाठी संसारासाठीचे, आमच्या लेकीसाठी अविरत कष्ट आणि आमच्या आई-वडिलांचे, सासूचे, आमच्या बहीण-भावांचे, मित्रमंडळी, शुभचिंतकांचे, भरभरून आशीर्वाद, भरभरून शुभेच्छा, ज्या मला आयुष्यभर पुरतील इतक्या.”
मलिंद गवळी पुढे म्हणाले, “आजच्या दिवशी आमचा साखरपुडा झाला होता. 25 मार्च 1990. आणि आमचं लग्न 26 मे 1990 मध्ये झालं.”
