Milind Gawali on Atul Parchure: मिलिंद गवळी हे त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. सध्या ते ‘वचन दिले तू मला’या मालिकेत काम करत असल्याचे दिसत आहेत.

अभिनयाबरोबरच ते सोशल मीडियावरही सक्रिय असतात. ते अनेक आठवणी, किस्से शेअर करतात. आता नुकत्याच त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांची आठवण सांगितली आहे.

एक व्हिडीओ शेअर करत मिलिंद गवळी यांनी लिहिले, “अतुल परचुरे यांनी ‘जोडी नंबर वन’ या झी टीव्हीच्या कार्यक्रमासाठी घेतलेले आमच्या मुलाखतीचा व्हिडीओ कुणीतरी मला फॉरवर्ड केला.”

“अतुल आपल्यात नाही हे अजूनही खरं वाटत नाही…”

पुढे त्यांनी लिहिले, “जवळजवळ पंचवीस वर्षांपूर्वीची ही मुलाखत होती. त्यावेळीचे अतुल बरोबरचे सगळे प्रसंग अगदी काल घडल्याप्रमाणे डोळ्यासमोरून गेले. अतुलला मी कधीही अतुल अशी हाक मारली नाही. नेहमी त्याला अतुलनीय म्हणायचो. आणि तो होताच तसा, तो अतुलनीय होता.”

“१४ ऑक्टोबर २०२४ ला अतुल आपल्याला सोडून निघून गेला. अतुल आपल्यात नाही हे अजूनही खरं वाटत नाही. काल-परवापर्यंत आपल्याशी छान गप्पा मारणारा, आपल्याला हसवणारा, आपलं भरभरून कौतुक करणारा आपला छानसा मित्र, अचानक कायमचा हे जग सोडून निघून जातो. परत कधीही आपण त्याच्याशी बोलू शकणार नाही, परत कधीही आपण त्याला बघू शकणार नाही. आता आपण कधीच त्याच्याबरोबर काम करू शकणार नाही, एकदा मनुष्य निघून गेला की सगळं तिथेच थांबतं. रितंपण जाणवत राहतं.”

“अशी जवळची आणि छान माणसं जेव्हा निघून जातात तेव्हा त्यांची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. आपण असं जगत असतो की आपण आहोत आणि कायमचे राहणार आहोत. आपल्याकडे खूप वेळ आहे, पण नाही. खरंतर आपण पण पुढे सरकत आहोत, आज आहोत उद्या नसणार आहोत.”

मिलिंद गवळी यांनी असेही लिहिले, “जग काही तुमच्या आमच्या वाचून थांबणार नाही. त्यामुळे जे काही करायचं आहे ते आपल्याला आता करायचं आहे. आपले एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटायचं राहून गेलं असेल, त्याच्याशी बोलायचं राहिलं असेल, तर उद्यावर ढकलू नका. योग्य वेळ आहे आता आहे.”

“अतुलबरोबर पुन्हा काम करायची इच्छा, एकत्र भेटून छान गप्पा मारायची इच्छा, सगळं सगळं राहूनच गेलं. जे आता या जन्मात शक्य नाही.फक्त त्याच्याबरोबरच्या छान आठवणी त्या मात्र कायमस्वरूपी माझ्याजवळ मी असेपर्यंत राहणार आहे. कालाय तस्मे नमः त्या काळाला आणि वेळेला वंदन”, असे म्हणत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.