Milind Gawali Post: मिलिंद गवळी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘वचन दिले तू मला’ या मालिकेत काम करीत आहेत. मालिका, सिनेमा या माध्यमांतून मिलिंद गवळी प्रेक्षकांच्या भेटीला येतात. पण, त्याबरोबरच ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील भेटीला येतात.

सोशल मीडियावर ते विविध पोस्ट शेअर करीत जुने किस्से, आठवणी सांगतात. एखाद्या कलाकाराबरोबर काम केल्याचा अनुभव कसा होता, एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर काय अनुभव आला, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला खास किस्सा कोणता याबद्दल मिलिंद गवळी वेळोवेळी सोशल मीडियावर लिहितात.

“म्हाताऱ्याची भूमिका…”

आता नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारण्याचा अनुभव सांगितला आहे. मिलिंद गवळी यांनी लिहिले, “मागच्या महिन्यात माझा मित्र परितोष पेंटरच्या नाटकाला वांद्र्याला पोहोचतच होतो, तेव्हा आकाश गुरसळेचा फोन आला होता. त्यानं मला ‘अथांग’च्या दिग्दर्शनामध्ये खूप मदत केली होती. तो म्हणाला की, पुण्यामध्ये सिनेमाचं शूटिंग करत आहे; पण ऐन वेळी एका कलाकारानं माघार घेतली आहे. उद्याचं शूटिंग झालं नाही, तर निर्मात्याचं खूप नुकसान होईल. तर, तुम्ही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकाराल का?”

Award Banner

पुढे त्यांनी लिहिलं, “ऐन वेळी आलेलं काम मी कधीच केलं नव्हतं. आकाशला नाही म्हणता आलं नाही. मी होकार दिला. परितोषच्या नाटकाचा प्रयोग न बघताच त्याला शुभेच्छा दिल्या आणि गाडी पुण्याला वळवली. कोणता सिनेमा आहे? निर्माते, दिग्दर्शक कोण आहेत? माझी भूमिका काय आहे? काहीही न विचारता, सकाळी ७ वाजता सेटवर पोहोचलो.”

मिलिंद गवळी यांनी सेटवर गेल्यानंतर काय घडले, याबद्दल पुढे लिहिले. त्यांनी लिहिले, “सेटवर गेल्यानंतर कळलं की, म्हाताऱ्याची भूमिका आहे. २-३ तास मेकअप करून म्हातारा झालो. म्हातारा म्हणून दोन दिवस शूटिंगचा आनंद घेतला. मग म्हाताऱ्याचा मुखवटा पुण्यातच सोडला आणि मुंबईला परत आलो. एक वेगळा अनुभव मिळाला.”

“मी म्हातारा होणार नसल्यामुळे कमीत कमी…”

पुढे त्यांनी लिहिले, “अनेक वर्षांपूर्वी मला पंढरी जुकर, जे खूप मोठे मेकअपमन होऊन गेले. त्यांनी बालाजी टेलिफिल्मसाठी मला एकदा म्हातारं केलं होतं. त्यानंतर रमेश नोहाटे हे अभिनेता गोविंदाचे मेकअपमन होते. त्यांनी माझा ‘दुर्गा म्हणत्यात मला’ या चित्रपटासाठी म्हाताऱ्याचा मेकअप केला होता. त्यानंतर समीर म्हात्रेनं स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेसाठी एका स्वप्नातला दृश्यासाठी म्हातारा केला होता. प्रत्येक वेळेला म्हातारं होताना मला खूपच मज्जा आली. म्हातारपणाकडे जाण्याची प्रक्रिया सुंदर आहे. पण, मला तरुणपणीच मरायचं आहे. मी म्हातारा होणार नसल्यामुळे कमीत कमी आपण म्हातारे झाल्यावर कसे दिसलो असतो याचा थोडाफार अंदाज आला”, अशा भावना व्यक्त करत मिलिंद गवळी यांनी मी म्हातारा होणार नाही, असे लिहिले आहे. याबरोबरच, त्यांनी काही फोटो शेअर आहेत.