Milind Gawali on Ata Hou De Dhingana: ‘आता होऊ दे धिंगाणा’चा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील विविध मालिकांमधील कलाकार हजेरी लावतात. एकावेळी दोन किंवा तीन मालिकांतील कलाकार या शोमध्ये येतात. मालिकांनुसार टीम केल्या जातात. त्यांना विविध टास्क दिले जातात. आता मिलिंद गवळी यांनी नुकतीच आता होऊ द्या धिंगाणामध्ये हजेरी लावली होती. त्याचा अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘आता होऊ दे धिंगाणा ५’च्या मंचावर मिलिंद गवळींना ‘असा’ आला अनुभव
मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर आता होऊ दे धिंगाणा या शोमधील काही फोटो शेअर करत लिहिले, “‘आता होऊ दे धिंगाणा सीजन ५’ मध्ये मला माझ्या ‘वचन दिले तू मला’ या मालिकेतल्या सहकलाकारां बरोबर आमंत्रित केलं होतं. या मालिकेतले माझे सहकलाकार हे उत्तम कलाकार आहेतच. कामाच्या वेळेला फक्त कामावर लक्ष असतं. पण. शूटिंगच्यामध्ये जर वेळ मिळाला तर ते इतकी दंगा मस्ती करतात. इतका धिंगाणा घालतात की कोणी कल्पनाच करू शकणार नाही.

त्यांनी पुढे असेही लिहिले, “मी आजपर्यंत कुठल्याही सेटवर इतका हसलो नसेल जितका या मालिकेच्या सेटवर हसलो आहे.आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो की ही माणसं इतके कसे काय आनंदी राहू शकतात. त्यामुळे मी वाटच बघत होतो की ‘आता होऊ दे धिंगाणा’मध्ये आमच्या या भन्नाट टीमला कधी आमंत्रित करतायत आणि शेवटी ही भन्नाट टीम पोहोचलीच. त्यांनी जो हैदोस सेटवर घातला आहे, तो कल्पनेच्या पलीकडे आहे. त्यांची मस्ती बघून त्या सेटवरचा एका गोरिला माकडाला धक्का बसला होता.”

अमित भानुशाली आणि सिद्धार्थ जाधव यांच्याबद्दल मिलिंद गवळींनी लिहिले, “‘ठरलं तर मग” या मालिकेतले कलाकार आमच्या विरुद्ध टीम होती. त्यात माझा मित्र अमित भानुशाली होता. तो सुद्धा मस्ती करण्यामध्ये कोणालाच ऐकत नाही. हा कार्यक्रम एका माणसाच्या खांद्यावर असतो आणि तो म्हणजे माझा मित्र सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थच टॅलेंट, त्याची ऊर्जा, कोणीच मॅच करू शकत नाही. त्यात तो इतका नम्र आहे की सिद्धार्थची जागा कोणीही घेऊ शकत नाही, त्याच्यासारखा तोच आहे.
आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर काय अनुभव आला, याबद्दल त्यांनी लिहिले, “यावेळेला खूपच मजा आली. धिंगाणा सीजन पाच करताना सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कसा वेळ निघून गेला कळत नाही. आम्ही सगळेच इतकी मस्ती करतो की रात्री थकून घरी पोहोचल्यावर मेल्यासारखी झोप लागते. पण झोपेत सुद्धा माझी खात्री आहे की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असणार. झोपेत सुद्धा खळखळून हसत असणार.

शेवटी त्यांनी लिहिले, “धिंगाणा सारखा कार्यक्रम आजच्या काळामध्ये कलाकारांसाठी आणि प्रेक्षकांसाठीसुद्धा खूप महत्त्वाचा आहे., हा एक तणाव कमी करणारा कार्यक्रम आहे. पहिल्या वेळेला मी जेव्हा या मंचावर गेलो त्यावेळेला मला असं वाटलं की हा काय बालिशपणा आहे. काय हे सगळे लहान मुलांसारखे वागत आहेत. पण या धिंगाणाच्या मंचावर प्रत्येकाच्या आत दडलेलं लहान बाळ बाहेर येऊन अक्षरशः बागडायला लागतात. आता आमची मालिका संपत आली, त्यामुळे पुन्हा कधी धिंगाणा कार्यक्रमांमध्ये आमंत्रित होऊ, हे आता कोणालाच सांगता येणार नाही”, असे लिहित मिलिंद गवळींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
