मिलिंद गवळी ते काम करत असलेल्या मालिका, चित्रपटांबद्दल नेहमी सोशल मीडियामार्फत पोस्ट शेअर करत माहिती देत असतात. अशातच आता नुकतीच त्यांनी त्यांची ‘वचन दिले तू मला’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत अल्यानिमित्ताने पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्री अनुष्का सरकटे व अभिनेता इंद्रनील कामत मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेत मिलिंद गवळी यांनी इंद्रनीलच्या वडिलांची हर्षवर्धन जहागीरदारची भूमिका साकारली. आता ही मालिका ११ महिन्यांनंतर प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने मिलिंद गवळी यांनी या पोस्टला मोठी कॅप्शन देत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.यावेळी त्यांनी मालिकेच्या सेटवरील कलाकारांचे भावनिक क्षण दाखवणारा व्हिडीओही शेअर केला आहे.
मिलिंद गवळींची भावुक पोस्ट
मिलिंद गवळी यांनी या पोस्टला कॅप्शन देत म्हटलं की, “कालचा शेवटचा दिवस होता, वचन दिले तू मला या मालिकेचा प्रवास काल रात्री आम्हा कलाकारांसाठी संपला. एक अध्याय संपला. २८० एपिसोड पूर्ण करून आम्ही थांबलो. जवळजवळ ११ महिन्याचा हा आमच्या मालिकेचा प्रवास, फारच भारी होता. स्टारप्रवाह आणि सेवेन्थ सेन्स मीडियाने बनवलेली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. वकिलांचं घराणं असलेल्या जहागीरदार कुटुंबाची ही आगळीवेगळी कथा होती. याच कुटुंबातला मी हर्षवर्धन जहागीरदार एका निष्णात वकिलाची भूमिका गेल्या ११ महिने जगत होतो, या वर्षभरात मला खूप काही शिकायला मिळालं, भारतीय संविधान, फौजदारी कायदा (गुन्हे, शिक्षा), दिवाणी प्रक्रिया (CPC),करार कायदा, मालमत्ता कायदा, कुटुंब कायदा,कंपनी कायदा, कामगार कायदा, पुरावा कायदा IPC ते BNS? CrPC (फौजदारी प्रक्रिया संहिता) होतं, आता BNSS (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता),Evidence Act (पुरावा कायदा) BSA (भारतीय साक्ष्य अधिनियम).”
“मी माझ्या ग्रॅज्युएशन नंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं, मग सोडून दिलं होतं, पण माझ्या नशिबात कायद्याचा अभ्यास होताच आणि तो या मालिकेच्या निमित्ताने गेल्या वर्षात झाला. वडील पोलीस खात्यातून निवृत्त झाले असल्यामुळे घरात वातावरण या विषयाला पोषक होतच. पण खरंच खूप मजा आली ही मालिका करायला, आणि हर्षवर्धन जागीरदारसारखं पात्र करायला तर मज्जाच आली, शशांक सोळंकीचा खूप आभारी आहे, स्टार प्रवाह या वाहिनीचा मी खूप आभारी आहे, आणि इतकी भन्नाट टीम, कलाकार तंत्रज्ञ यांच्याबरोबर काम करून खूप आनंद झाला. सगळ्यांचा खूप खूप ऋणी आहे आभारी आहे.”
पुढे त्यांनी म्हटलं की, “१५ डिसेंबर २०२५ रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाह वर सुरू झाली, १६ फेब्रुवारी पासून रात्री १०वाजता प्रसारित व्हायला लागली, मग २७ एप्रिल पासून संध्याकाळी ६.३० वाजता, १० ऑगस्ट असून दुपारी १ वाजता. आणि ११ ऑक्टोबरला आमची मालिका संपणार. एका छान मालिकेचा छान प्रवास प्रेक्षकांच्या हृदयात घर करून संपला.”
