Madalsa Sharma Casting Couch Experience: ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेत ‘काव्या’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मदालसा शर्मा सध्या एका खळबळजनक खुलाशामुळे चर्चेत आली आहे. मदालसाने तिच्या संघर्षाच्या काळातील एक कटू अनुभव सांगितला. दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून असलेल्या मदालसाला वयाच्या १९ व्या वर्षी एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने मीटिंगसाठी चक्क बिकिनी घालून बोलावले होते. “मला तुझी बॉडी लँग्वेज पाहायची आहे,” असे कारण त्या दिग्दर्शकाने दिले होते. मात्र, मदालसाने डगमगून न जाता त्याला सडेतोड उत्तर दिले आणि तिथून बाहेर पडली.

‘द मेल फेमिनिस्ट’ या पॉडकास्टमध्ये बोलताना मदालसाने हा प्रसंग सांगितला. मदालसा ही दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह याची पत्नी आहे. ही घटना घडली तेव्हा मदालसा साधारण १९ वर्षांची होती. “एका अत्यंत प्रसिद्ध दिग्दर्शकाने मला मीटिंगसाठी बोलावलं होतं. त्यांना एका अशा मुलीची गरज होती जी बिकिनीमध्ये सहज वावरेल. खरं तर त्यावेळी मला वाटलं की यात काही मोठी गोष्ट नाही,” असं मदालसा म्हणाली. सुरुवातीला तिला वाटलं की इथे फक्त कामाबद्दल चर्चा होईल. पण तिने बिकिनीच का घालून यायचं यामागचं कारण जाणून घ्यायचं ठरवलं. “मी तेव्हा १९ वर्षांची असले तरी हुशार होते,” असं मदालसाने सांगितलं.

मदालसा शर्माने सांगितला संपूर्ण प्रकार

मदालसाने दिग्दर्शकाला सडेतोड उत्तर दिलं होतं. “तो दिग्दर्शक म्हणाला की, मला हे पाहायचंय की तू बिकिनी घालू शकतेस का. ‘मला तुझी बॉडी लँग्वेज पाहायची आहे,’ असे तो म्हणाला. कॅमेऱ्यासमोर बिकिनी घालण्यात मी कंफर्टेबल असेन की नाही, हे त्याला पाहायचं होतं. त्यावर मी त्याला म्हटलं, ‘मला माफ करा, मी अभिनेत्री आहे. जर एखाद्या सीनसाठी बिकिनीची गरज असेल किंवा साडी किंवा लेहेंगा असो, जे काही असेल ते मी कॅमेऱ्यासमोर घालण्यास तयार आहे आणि त्यात मी कम्फर्टेबल असेन, कारण तो माझ्या कामाचा भाग आहे. पण तुमच्यासमोर बिकिनी घालणं हा माझ्या कामाचा भाग नाही! त्यामुळे जर तुम्हाला माझ्या टॅलेंटवर विश्वास ठेवून मला कास्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता, आणि नसेल करायचं तर बाहेर जाण्याचा रस्ता मला माहित आहे!’” असं मदालसाने त्या दिग्दर्शकाला ठणकावून सांगितलं होतं.

Anupamaa Actress Madalsa Sharma talking about casting couch
अभिनेत्री मदालसा शर्मा (फोटो- इन्स्टाग्राम)

मदालसाने तिथून बाहेर पडल्यानंतर त्या घटनेचा फारसा विचार केला नाही. मात्र, काही दिवसांनंतर तिला त्याच कास्टिंगबद्दलची एक बातमी वाचायला मिळाली. त्या दिग्दर्शकाने शेवटी त्याच अभिनेत्रीला घेतलं, जिच्याबरोबर तो नात्यात होता, असं मदालसाने सांगितलं.

मदालसा शर्माचे करिअर

मदालसा शर्माने २००९ मध्ये ‘फिटिंग मास्टर’ या चित्रपटातून तेलगू सिनेसृष्टीतून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने तेलगू, कन्नड, तमिळ, पंजाबी आणि हिंदी भाषेत कम केलं. स्टार प्लसवरील ‘अनुपमा’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने ‘काव्या’ ही नकारात्मक भूमिका साकारली होती. या मालिकेत रुपाली गांगुली मुख्य भूमिकेत आहे. मदालसाने सप्टेंबर २०२४ मध्ये ही मालिका सोडली.