Actor Mohsin Khan marries Tamanna : टेलिव्हिजन विश्वातील अतिशय लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता मोहसीन खानने अचानक लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या लाखो चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ऑगस्ट महिन्यात अत्यंत साधेपणाने साखरपुडा उरकल्यानंतर, आता ३ ऑक्टोबर रोजी मोहसीनने तमन्नासोबत गुपचूप निकाह केला. रविवारी सोशल मीडियावर या खासगी विवाहसोहळ्याचे फोटो समोर येताच ते व्हायरल झाले आहेत. या खास फोटोंमध्ये मोहसीन आणि त्याची पत्नी तमन्ना यांचा अतिशय सुंदर आणि रॉयल लुक पाहायला मिळत आहे. चाहत्यांकडून या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
मोहसीनने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या लग्नाची झलक पाहायला मिळते. लग्नात मोहसीनने पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा टक्सिडो घातला होता, तर तमन्नाने रंगीबेरंगी लेहेंगा घातला होता. याशिवाय त्यांच्या मेहंदी सोहळ्यातील एक व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला आहे.
पाहा मोहसीन खानची पोस्ट
रविवारी मोहसीन खानने इन्स्टाग्रामवर तमन्नाबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं, “The Day, MashaAllah.” या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “सुंदर जोडी, दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत.” दुसऱ्या युजरने “तुमच्या दोघांचे अभिनंदन, तुम्ही दोघेही खूप छान दिसत आहात” अशी कमेंट केली.
मोहसीनच्या फॅन क्लबने काही व्हिडीओ शेअर केले आहेत. एका व्हिडीओत मोहसीन ‘छम्मक छल्लो’वर डान्स करताना दिसतोय. तर दुसरा त्यांच्या निकाहचा व्हिडीओ आहे. तर एका व्हिडीओत मोहसीन व तमन्ना कुटुंबियांबरोबर डान्स करताना दिसत आहेत.
कोण आहे मोहसीन खानची पत्नी तमन्ना?
मोहसीन खानची पत्नी तमन्ना फिल्म इंडस्ट्रीतील नाही. तमन्ना नेमकं काय करते? याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
दरम्यान, मोहसिन खान २०२१ मध्ये ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका सोडल्यापासून टेलिव्हिजनपासून दूर आहे. तो शेवटचा २०२४ मधील एका वेब सीरिजमध्ये दिसला होता. मोहसीनचा Velaire नावाचा स्वतःचा परफ्यूम ब्रँडही आहे.
