Mrinal Kulkarni Birthday : मृणाल कुलकर्णी व शिवानी रांगोळे या सासू-सुनेची जोडी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघींचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शिवानी आणि विराजस यांचा लग्नसोहळा २०२२ मध्ये थाटामाटात पार पडला होता. मृणाल कुलकर्णी शिवानीला आधीपासूनच ओळखत होत्या. या दोघींनी एका प्रोजेक्टदरम्यान एकत्र काम देखील केलेलं होतं. त्यामुळे त्यांच्यात पहिल्यापासून खूपच सुंदर बॉण्डिंग आहे. आज सासुबाईंच्या वाढदिवसानिमित्त शिवानीने खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मृणाल कुलकर्णी व शिवानी रांगोळे यांच्यामध्ये सासू-सुनेपेक्षा मैत्रीचं नातं जास्त आहे. विशेष म्हणजे शिवानी तिच्या सासूबाईंना ‘ताई’ या नावाने हाक मारते.

शिवानीने सासुबाईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबरोबरचे सुंदर फोटो शेअर करत एक छान पोस्ट देखील लिहिली आहे. शिवानी म्हणते, “वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा ताई! तू नेहमीच स्वतःच्या कृतीतून समोरच्याला आदर्श घालून देतेस. कठीण प्रसंगांमधील तुझी जिद्द, कलानिर्मितीसाठी तुझ्यात असलेली ती धडपड, इतरांचं आयुष्य सुसह्य करण्याची तुझी वृत्ती आणि तुझं ते प्रेमळ हास्य अशा अनेक गोष्टी आम्ही तुझ्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो. तू नेहमी अशीच आनंदी राहा!”

लग्नाआधी अनेक वर्षे शिवानी आणि विराजस यांची खूप चांगली मैत्री असल्याने सासरच्या घरी शिवानीचं सर्वांशी एक सुंदर बॉण्डिंग तयार झालं होतं. शिवानी ही मृणाल कुलकर्णी यांची अत्यंत लाडकी आहे. त्या आपल्या सुनेचा मुलीप्रमाणे सांभाळ करतात. या दोघींच्या बॉण्डिंगची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली असते.

दरम्यान, या दोघींच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, मृणाल कुलकर्णी व शिवानी रांगोळे एकत्र ‘कोहम’ नाटकात काम करत आहेत. गो. नी. दांडेकर यांच्या साहित्यावर आधारित हे अभिवाचन आहे. याचं दिग्दर्शन सुरज पारसनीस आणि विराजस कुलकर्णी यांनी केलं आहे. याशिवाय शिवानी ‘शंकर जयकिशन’ या नाटकात देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. या नाटकात तिच्यासह भरत जाधव, महेश मांजरेकर असे दिग्गज कलाकार आहेत.