Mrunal Dusanis : मृणाल दुसानिस मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत विविध कथानक असलेल्या मालिकेत काम करत प्रेक्षकांच्या मनात जणू घर केलं आहे. आतापर्यंत तिने अनेक हिट मालिका दिल्या आहेत. पण, यशाच्या शिखरावर असताना मृणालने करिअर सोडण्याचा निर्णय घेतला होता याबद्दल तिने स्वत: सांगितलं आहे.

मृणाल दुसानिसने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेने’, ‘हे मन बावरे’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘तू तिथे मी’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. सध्या ती ‘स्टार प्रवाह’वरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. यानिमित्तानेच तिने नुकतीच अल्ट्रा मराठीला मुलाखत दिली असून त्यामध्ये तिने ‘हे मन बावरे’ या मालिकेनंतर पुढे काम न करण्याचा निर्णय घेतला होता याबद्दल सांगितलं आहे. मृणाल नेमकं काय म्हणाली आणि तिने हा निर्णय का घेतलेला, तसंच तिने पुन्हा कमबॅक कसं केलं याबद्दल जाणून घेऊयात…

मातृत्वाबद्दल मृणालची प्रतिक्रिया

मृणालच्या मालिकेत सध्या गरोदरपण, मातृत्व यावर आधारित गोष्टी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मुलाखतीत आई होण्याबद्दल बोलत असताना मृणालने तिने पुढे काम न करण्याचा निर्णय घेतला होता याबद्दल सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, “मी आई झाले हाच किस्सा आहे. आई होणं ही जबाबदारीची गोष्ट आहे. आईसाठी सगळंच कठीण असतं. आता मी जेव्हा माझ्या आईला बघते तेव्हा असं वाटतं की तिने त्यावेळी सगळं कसं केलं असेल आणि मी किती सहज तिला काहीही बोलून जायचे, पण एक बाळ सांभाळायला गाव लागतं असं म्हणतात ना ते खरं आहे. आई होणं सोपं नाहीये.”

मला पुढे काम करायचं नव्हतं – मृणाल

मृणालला पुढे तू आई होणार हे कळल्यानंतर तुझ्या करिअरबद्दल तुला काळजी नाही वाटली का? असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “नाही. मी जेव्हा या आधीची मालिका करत होते. तेव्हाच ठरवलेलं की मला आता पुढे काम नाही करायचं आहे. अभिनय नाही करायचाय ही माझी शेवटची मालिका. मी तिकडे गेले होते ते सगळं सोडूनच गेले होते. खूप अनअपेक्षितपणे मला कळलं की मी आई होतेय. त्यामुळे मी आनंदी होते. पण, बाळ झाल्यानंतर मला वाटायला लागलं की आता मी काय करू. ज्या देशात मी होते. तिथे माझी माणसं नव्हती, माझ्याशी बोलायला कोणी नव्हतं. माझा नवरा त्याच्या कामात खूप व्यग्र होता. त्यामुळे त्यानेच मला सांगितलं की तुला तुझं करिअर करायचं असेल तर कर कशाला काळजी करतेस बाकीची माणसं आहेत.” लग्नानंतर मृणाल काही वर्षे नवऱ्याबरोबर परदेशात राहत होती.

अभिनेत्री पुढे म्हणाली, “नशिबाने मी पुन्हा काम सुरू करू शकले, त्यासाठी खूप चांगली माणसं लागतात. त्यामुळेच मी काम सुरू करू शकले. या संपूर्ण प्रवासात माझा नवरा माझ्यासोबत होता. आपला जोडीदार कायम आपल्याबरोबर असतो. लग्नानंतर तुमच्या नवऱ्याशिवाय दुसरं कोणी नसतं. तोच तुम्हाला समजून घेतो, सहन करतो. पण, जेव्हा मी आई होणार होते तेव्हा मला अशी भीती नव्हती की काम मिळेल की नाही. उलट मी खूप आनंदी होते.”