Shashank Ketkar and Mrunal Dusanis : मृणाल दुसानिस व शशांक केतकर यांच्या जोडीने ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या कलर्स मराठीच्या मालिकेत एकत्र काम केलं होतं. यामध्ये दोघांनी अनुक्रमे सिद्धार्थ आणि अनुश्री ( अनु ) या भूमिका साकारल्या होत्या. या दोघांची जोडी सर्वत्र सुपरहिट ठरली होती. इतकंच नव्हे तर मृणाल अमेरिकेहून परतल्यावर जेव्हा शशांक आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटली… तेव्हा सुद्धा चाहत्यांनी या दोघांनी पुन्हा मालिकेत एकत्र काम करावं अशी इच्छा व्यक्त केली होती.

शशांक आणि मृणालच्या जोडीने एकत्र सुलेखा तळवलकरांच्या ‘दिल के करीब’ला दिलेल्या मुलाखतीत उपस्थिती लावली होती. या मुलाखतीचं शूटिंग मृणालच्या ठाण्यातील रेस्टॉरंटमध्ये करण्यात आलं आहे. यावेळी शशांकने गमतीत मृणालला विचारलं, “इथे मांजर वगैरे आलेली चालते ना?” यावर मृणालने हसत-हसत “नाही…” असं उत्तर दिलं.

पुढे शशांक केतकर याबद्दल म्हणाला, “हे मन बावरे या मालिकेच्या सेटवर मी अनेकदा मृणालबरोबर प्रँक केले आहेत. मृणाल मांजरप्रेमी आहे…” यावर मध्येच पटकन मृणाल म्हणाली, “अजिबात नाही. मला मांजरी आवडत नाही.”

Award Banner

मृणाल याबद्दल सांगते, “मला मांजर हा प्राणी जगातून नाहीसा करण्याची इच्छा आहे. मला मांजरी आवडत नाहीत. शशांक काय करायचा माहितीये…त्याने तेव्हा मांजरीच्या आवाजाचं रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं. माझ्या मेकअप रूमच्या दाराबाहेर तो मांजरीचं रेकॉर्डिंग वाजवायचा. काहीच नाही तर तोंडाने मांजरीसारखा आवाज काढायचा. त्यापेक्षा पुढची गोष्ट म्हणजे…त्याने सेटवर काही माणसं नेमली होती की, तुम्ही जाता-येता मांजरीचा आवाज काढत जा.”

शशांक यावर म्हणाला, “अरे सेटवर तो एक टाइमपास व्हायचा. नाहीतर या…सीन करा आणि घरी जा असं होईल. आता मी ‘मुरांबा’ मालिकेच्या सेटवर सुद्धा अशीच मजा-मस्ती करतो. अनेकदा प्रँक करतो…या सेटवर सुद्धा मी भयंकर लेव्हलचे प्रँक केले आहेत. ‘मुरांबा’मधील एका अभिनेत्रीला मी सांगितलं होतं आपलं लंडनला शूटिंगला आहे आणि तिला ते खरं सुद्धा वाटलं होतं…असे खूप प्रँक मी केले आहेत.”

दरम्यान, मृणाल-शशांकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या मृणाल ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तर शशांक ‘मुरांबा’ मालिकेत मुख्य भूमिकेत झळकतोय.