आपल्या सहज सुंदर अभिनयाने सर्वांची मनं जिंकून घेणारी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच मृणाल दुसानिस. घराघरांत तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. २०१० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून मृणालने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. तिची ही पहिलीच मालिका सुपरहिट ठरली होती. यामधील अभिजीत शमिकाची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली होती.
काही वर्षांपूर्वी सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल कें करीब’ला दिलेल्या मुलाखतीत मृणाल दुसानिसने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेच्या शूटिंगचा किस्सा सांगितला आहे. पहिल्यांदा कॅमेरा फेस करताना निश्चितच सर्वांना दडपण येतं. तुला असं काही जाणवलं होतं का? यावर मृणाल काय म्हणालीये पाहुयात…
अभिनेत्री सांगते, “हो! मला आमच्या शूटिंगचा पहिला दिवस अजूनही आठवतोय. एकतर ज्यादिवशी माझं शूट सुरू होणार होतं, त्यादिवशी माझी आई नाशिकला परत जाणार होती. त्याआधी अगदी तीन दिवसच आम्ही दोघी मुंबईत राहत होतो. मला आधी खूप विश्वास होता…एवढं काही नाहीये, मी एकटीने सगळं करेन. पण, प्रत्यक्षात उलटंच झालं.”
मृणाल पुढे म्हणाली, “याचदरम्यान मालिकेचा सीन सुरू झाला. यामध्ये माझ्या बहिणीने आत्महत्या केलेली असते आणि तिच्या आठवणीत नायिकेला रडायला येत असतं. खिडकीत लूक देऊन मला रडायचं होतं. माझा लूक खिडकीकडे होता आणि तिथेच बाहेर माझी आईसुद्धा उभी होती. आता तेव्हा आई पुन्हा नाशिकला जाणार हा विचार करून मी खूप रडले. मी योग्यवेळी रडल्यामुळे त्या शॉटसाठी माझ्या भावना एकदम नीट मॅच झाल्या.”
“याशिवाय ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ ही बालाजीची मालिका होती. त्यात मी, अभिजीत वगैरे आम्ही सगळेच नवखे होतो. तेव्हा प्रोफेशनली कॅमेरासमोर मी पहिल्यांदाच अभिनय करत होते. त्यामुळे धाकधूक तर होतीच.” असं मृणाल दुसानिसने सांगितलं.
दरम्यान, मृणाल दुसानिस सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तिची ही मालिका स्टार प्रवाहवर दुपारच्या सत्रात प्रसारित केली जाते. तिच्यासह या मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर, ऋजुता देशमुख, अविनाश नारकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर असे सगळे लोकप्रिय कलाकार आहेत.
