मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री मृणाल दुसानिसने वैयक्तिक आयुष्यात २०१६ मध्ये नीरज मोरेशी लग्न केलं. मृणाल-नीरजचं अरेंज मॅरेज आहे. त्यांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली असली तरीही, मृणालच्या संसाराची सुरुवात २०२१ मध्ये झाली. त्याआधी हे दोघंही लाँग डिस्टन्समध्ये राहत होते. ‘हे मन बावरे’ मालिका संपल्यावर मृणाल अमेरिकेत शिफ्ट झाली. त्यामुळे अलीकडच्या पिढीला लाँग डिस्टन्सबद्दल तू काय सल्ला देशील यावर अभिनेत्रीने तिचं मतं व्यक्त केलं आहे.

मृणाल दुसानिस ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “मला असं खरंच वाटतं की, लाँग डिस्टन्स करू नये. माझं आणि नीरजचं आम्हा दोघांचंही आता हेच म्हणणं आहे. कारण, लाँग डिस्टन्समध्ये आपल्याला माणूस समजत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी माणसं ही वेगळी असतात. मुळात अलीकडच्या काळात लग्न हे नीट चौकशी करून केलं पाहिजे. लाँग डिस्टन्स शक्यतो आता करूच नये. आता संपूर्ण जग बदललंय. १० ते ११ वर्षांपूर्वीसारखी परिस्थिती आता राहिलेली नाहीये. आपल्याला एकदा समजलं की, आपल्याबरोबर जो माणूस आहे, ज्या व्यक्तीशी आपण लग्न केलंय तो किंवा ती खूप चांगलीये…मग सगळं जुळून येतं. त्यामुळे विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे.”

नीरज यावर म्हणाला, “सेम मलाही हेच वाटतं की सध्या लाँग डिस्टन्स अवघड आहे. आम्ही दोघंही एवढी वर्षे दूर कसे राहिलो ते आमचं आम्हालाच माहिती…पण, दोघांचीही प्रायोरिटी तेव्हा करिअर असल्याने ते जुळून आलं. आता ते शक्य नाहीये. ४-५ वर्षे लाँग डिस्टन्स आता जमणारच नाही.”

‘हे मन बावरे’ मालिका ऑक्टोबर २०२० मध्ये संपली आणि मृणाल डिसेंबर ( २०२० ) महिन्यात अमेरिकेला गेली. मृणाल याबद्दल सांगते, त्यावेळी माझ्या वडिलांचं निधन झालं होतं…त्यामुळे मी वैयक्तिक आयुष्यात सुद्धा थोडी डिस्टर्ब होते. तेव्हा असं जाणवलं की, या क्षणाला मी माझ्या कुटुंबीयांना सुद्धा वेळ दिला पाहिजे. त्यामुळे मी तो निर्णय ठरवून घेतला होता. अमेरिकेला गेल्यावर मी चार वर्षे तिकडे राहिलो. त्यावेळी मला कधीच मी कामापासून लांब आहे असं जाणवलं नाही. कारण, सगळे लोक माझ्या संपर्कात होते. आमच्या बातम्या होत होत्या. मी सगळ्यासाठी खूप ग्रेटफूल आहे. मला असं वाटायचं की मृणाल चार वर्ष नाही म्हणजे लोक आता विसरलेत पण, असं अजिबात झालं नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं.”