मनोरंजन क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अरेंज मॅरेज केलं आहे. यापैकीच एक म्हणजे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस. मृणालने नुकतंच तिच्या नवऱ्याबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा, त्यांचं लग्न कसं जुळलं याबद्दल सांगितलं आहे.

मृणाल दुसानिसने तिच्या लग्नाला दहा वर्षे झाली असल्याचं सांगत तिच्या नवऱ्याबरोबरच्या आणि कुटुंबीयांबरोबरच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी तिने लग्नाला दहा वर्षे झाली असली तरी त्यांनी फक्त चार वर्षेच एकत्र संसार केल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्रीने यावेळी लग्नाच्यावेळी तिच्या नवऱ्याने होकार देण्यासाठी बराच वेळ घेतल्याचा किस्साही सांगितला आहे.

लग्नासाठी मृणालने घेतलेला पुढाकार

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मृणालने तिनेच वडिलांच्या आग्रहानंतर पुढाकार घेऊन तिचा नवरा नीरज मोरेला मॅसेज केल्याचं सांगितलं. त्यानंतर तिला तुच पुढेकार घेत होतीस की त्याच्याकडूनही प्रतिसाद मिळत होता असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “पुढाकार मी घेतला होता पण, त्यालाही ते आवडत होतं.” त्यावर तिचा नवरा म्हणाला, “आम्ही वेगळ्या क्षेत्रात काम करत असल्यानेच जरा विचार करावा लागला.”

मृणालला लग्नासाठी होकार द्यायला नवऱ्याने घेतलेला वेळ

मृणालला पुढे नीरजच्या कुटुंबाकडून काही अपेक्षा होत्या का असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मला आठवतं की आई आणि त्याची बहीण निशिता आल्या होत्या घरी. त्यांच्याकडून मला कायमच सकारात्मक प्रतिसाद जाणवला. त्यांना माझ्या करिअबद्दल काहीच आक्षेप नव्हता त्यांनी माझ्या मालिका पाहिल्या होत्या. त्यांना कल्पना होती. फक्त त्याच्यासाठीच सगळे थांबले होते. तो तेव्हा खूपच लांब होता आणि होकार द्यायलाही त्याने वेळ घेतला.”

याचवेळी मृणालने लग्नानंतर त्यांना लाँग डिस्टन्समध्ये राहावं लागल्याचं सांगितलं आहे. मृणाल म्हणाली, “मला तर असं वाटतं लाँग डिस्टन्स नाही करायला पाहिजे. कारण आम्ही जेव्हा आता आमच्या नुर्वीचा विचार करत आहोत तर मला आणि नीरजला असंच वाटतं की लाँग डिस्टन्स रिलेशनशिप नको. कारण यामुळे माणसं आपल्याला कळत नाही आणि आता डिजीटल गोष्टी इतक्या वाढल्यामुळे आपण कोणाला काही सांगण्यापेक्षा समोरुनच आपल्याला चार गोष्टी जास्तीच्या कळतील. पण प्रत्येकाचा अनुभव, त्यांच्या आयुष्यात येणारी माणसं वेगळी असतात त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा लग्नचा निर्णय घ्ययाचा असतो तेव्हा नीट चौकशी केली पाहिजे.”

लाँग डिस्टन्सबद्दल मृणाल पुढे म्हणाली, “लाँग डिस्टन्स शक्य तर हल्ली नाहीच केलं पाहिजे. कारण आता हल्ली सगळं जग बदललंय. दहा अकरा वर्षा पूर्वीचं जगही वेगळं होतं आणि माणूस चांगला असेल तर कितीही लांब असला आपला माणूस तरी आपण मनाने जवळ असतो तो विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे त्यामुळे हल्लीच्या काळात मला माझ्यासाठी कठीण वाटतं.”