‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘हे मन बावरे’, अशा एकापेक्षा एक गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनेत्री मृणाल दुसानिसने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने ती कायमच सर्वांची मनं जिंकून घेते. मृणालचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. २०२० मध्ये ‘हे मन बावरे’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर मृणाल अमेरिकेत शिफ्ट झाली होती. मात्र, २०२४ मध्ये ती पुन्हा एकदा भारतात परतली. चार वर्ष कलाविश्वापासून दूर असली तरीही मृणालची लोकप्रियता जराही कमी झालेली नव्हती. भारतात परतल्यावर तिने पतीसह स्वत:चा बिझनेस सुरू केला. याशिवाय ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतून कमबॅक सुद्धा केलं.

मृणाल दुसानिसने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रेग्नन्सीचा काळ, यादरम्यान नवऱ्याने दिलेली साथ याबाबत तिने प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री म्हणाली, “प्रेग्नन्सीचा काळ माझ्यासाठी खरंच खूप अवघड होता. कारण, त्यावेळी कोव्हिडमुळे विमानं बंद होती. त्यामुळे कुटुंबातल्या कोणालाच इथून ( भारतातून ) अमेरिकेत यायला जमलं नाही. नवीन देश, नवीन लोक, डॉक्टरांची प्रोसेस सुद्धा सगळी वेगळी होती. पण, या सगळ्यात नीरजने माझी खूप काळजी घेतली. आपल्याला कोणीतरी हक्काचं हवं असतं…नीरज होता म्हणून सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या. तो उत्तम कूक आहे त्यामुळे त्याने माझ्या सगळ्या इच्छा, डोहाळे पूर्ण केले. अगदी पाणीपुरी, गुळपापडीपासून सगळ्या गोष्टी मी तेव्हा खाल्ल्या. डिलिव्हरीची तारीख जेव्हा होती, तेव्हा माझ्या सासूबाई आल्या होत्या. काही महिन्यांनी मग माझी आई अमेरिकेला आली. पण, त्या ९ महिन्यांच्या काळात मी आणि नीरज आम्ही दोघंच होतो.”

“९ महिने नीरजने माझी खूप काळजी घेतली…आम्ही दोघंही खूप फिरलो, एन्जॉय केलं. आम्ही डॅलसमध्ये राहत होतो. त्याठिकाणी बऱ्यापैकी भारतीय संस्कृती प्रचलित आहे कारण, आपल्याकडचे बरेच लोकही तिथे आहेत. त्यामुळे पाणीपुरी वगैरे तिकडच्या रेस्टॉरंटमध्ये आम्हाला सहज मिळायची. मी साडेचार वर्षे तिथे राहिले आणि नीरज पंधरा वर्षे तिथे होता.” असं मृणालने सांगितलं.

मृणाल काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेतल्या राहणीमानाबद्दल म्हणाली, “तिकडे किचनमध्ये काम करताना डिशवॉशर वगैरे या गोष्टी असतात हे मला मान्य आहे. पण, खरं सांगायचं झालं, तर अमेरिकेत राहणं खूप अवघड आहे आणि भारतात राहणं खूप सोपं आहे. आपल्याकडे घरकामाला मदतनीस ( हाऊसहेल्प) येतात. पण, तिथे कुणीच नसतं…त्यामुळे डिशवॉशर असला तरीही त्यात भांडी नीट आपल्याला लावावी लागतात. एवढेच नव्हे तर, आम्ही फर्निचर घ्यायचो तर ते जोडावं सुद्धा आम्हालाच लागायचं.”

“आपण मुळात अमेरिकेचे नसल्याने आपल्याला सगळ्या भारतीय गोष्टींची सवय आहे. कामाची सवय आहे. मी सगळी घरची कामं करतेच त्यामुळे मला असा फार त्रास झाला नाही. पण, मला इथे ( आपल्या देशात ) जास्त आवडतं. अमेरिकेत स्वच्छता होती ही एक गोष्ट मला खूप आवडते. पण, इथे शेवटी आपली लोक आहेत. त्यामुळे भारतातच जास्त मजा आहे.” असं मृणाल दुसानिसने सांगितलं.