Mrunal Dusanis : मृणाल दुसानिस मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काम करत आहे. अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग असून तिने साकारलेल्या आतापर्यंतच्या सर्व भूमिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतीसाद मिळाला आहे. अशातच आता तिने तिच्या चाहत्यांबद्दल सांगितलं आहे.

मृणालने आतापर्यंत मालिकांमधून साध्या, सोज्वळ आणि संस्कारी नायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत. तर खऱ्या आयुष्यातही ती तशीच असल्याचं तिच्या मुलाखतींमधून पाहायला मिळतं. त्यामुळे अभिनेत्रीला अनेकांची पसंती मिळते. अशातच आता तिच्या मालिकेत सध्या मातृत्व आणि गरोदरप तसंच गर्भपातासंदर्भातील सीन्स पाहायला मिळत आहेत. मात्र यामुळे तिचे चाहते नाराज असल्याचं तिने नुकत्याच दिलेल्य मुलाखतीत म्हटलं आहे.

मृणाल काय म्हणाली?

अल्ट्रा मराठीला दिलेल्या मुलाखतीत मृणालने याबद्दल सांगितलं आहे. मृणालला मुलाखतीत मालिकेत तुमच्या बाळाचा जो सीन दाखवला गेला जेव्हा तुझा गर्भपात होतो तो खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गेला त्यामुळे प्रेक्षकांनाही तो भावला त्याबद्दल काय सांगाल असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “ती अशी भावना आहे जी आम्ही कधी अनुभवलेली नाहीये. पण आम्ही प्रयत्न केला आमच्यापरीने त्याला न्याय देण्याचा. हा ट्रॅक पुढे अजून खुलत जाणार आहे. यातही त्यांना बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहे.”

मृणालला येतात मेसेज

मृणालला पुढे त्या सीनबद्दल तुला मॅसेज आले का असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मला पण खूप मेसेज येतात. मुली डीएम करतात. की हे नका करू. तुम्ही तर आई आहात ना मग तुम्ही का करताय? पण मी असं म्हणते की हा कथेचा भाग आहे त्यामुळे करावाच लागेल. खूप मुली बायका नाराज आहेत. त्यांना मिसकॅरेज, गर्भपात पाहायचा नाहीये. पण तो कथेचा भाग आहे. मात्र पुढे त्यांच्या आयुष्यात कसा आनंद येतो हेसुद्धा त्यांना पाहायला आवडणारच आहे.”

दरम्यान, विवेक व मृणाल यामध्ये नंदिनी व जीवा या भूमिका साकारत आहेत. मालिकेत काव्या गरोदर आहे तर दुसरीकडे नंदिनी व जीवा यांच्या आयुष्यात मोठं वादळ आलंय. त्यांनी त्यांचं बाळ गमावल्याचं सत्य त्यांना काव्याला कळू द्यायचं नसतं. एकंदरीतच मालिकेत सध्या नेहमीच ट्विस्ट येत असतात आणि आतासुद्धा महत्त्वाचे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.