Mrunal Dusanis Talks About Marriage : मृणाल दुसानिस मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं आहे. मृणालने आतापर्यंत पडद्यावर सोज्वल व सुशील नायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत, पण खऱ्या आयुष्यातही ती तशीच असल्याने प्रेक्षकांना तिचा स्वभावही भावतो. अशातच आता मृणालने तिच्या खासगी आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगितलं आहे.
मृणाल दुसानिसने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल, लाँग डिस्टन्स रिलेशनशिपबद्दल, नवऱ्याबद्दल आणि सासर व माहेरच्या लोकांबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने लग्नानंतर तिचं आयुष्य कसं बदललं आणि लाँग डिस्टन्समुळे तिच्या आयुष्यात आलेली आव्हानं याबद्दल सांगताना तिने हा काळ तिच्यासाठी व तिच्या नवऱ्यासाठी कठीण असल्याचं सांगितलं आहे. यावेळी तिने व तिच्या नवऱ्याने लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये जाण्याआधी विचार करण्याचा सल्लाही दिला आहे.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मृणालने सांगितलं की तिचं अरेंज मॅरेज असून तिच्या वडिलांमुळे तिचं व नीरज मोरेचं लग्न झालं. यावेळी तिने नवरा वेगळ्या क्षेत्रात असून तो परदेशात राहत असल्याने त्यांना लग्नानंतरही एकमेकांपासून जवळपास ७ वर्षे वेगळं राहावं लागलं आणि आता लग्नाला दहा वर्षे झाली असली तरी त्यातील फक्त ४ वर्षेच ते एकत्र राहिल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.
मृणाल लाँग डिस्टन्स रिलेशनशिपबद्दल काय म्हणाली?
मुणाल व तिच्या नवऱ्याला तुमचं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप होतं, त्यात तुम्ही दोघे वेगळ्या क्षेत्रात काम करता तरी तुम्ही १० वर्षे नातं टिकवलं हल्ली अनेक जण लाँग डिस्टन्समध्ये राहत आहेत त्यामुळे तुमच्याकडून त्यांना प्रेरणा मिळू शकते याबद्दल तुम्ही काय सांगाल असं विचारल्यानंतर मृणाल म्हणाली, “मला तर असं वाटतं लाँग डिस्टन्स नाही करायला पाहिजे. कारण आम्ही जेव्हा आता आमच्या नुर्वीचा विचार करत आहोत तर मला आणि नीरजला असंच वाटतं की लाँग डिस्टन्स रिलेशनशिप नको. कारण यामुळे माणसं आपल्याला कळत नाही आणि आता डिजीटल गोष्टी इतक्या वाढल्यामुळे आपण कोणाला काही सांगण्यापेक्षा समोरुनच आपल्याला चार गोष्टी जास्तीच्या कळतील. पण प्रत्येकाचा अनुभव, त्यांच्या आयुष्यात येणारी माणसं वेगळी असतात त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा लग्नचा निर्णय घ्ययाचा असतो तेव्हा नीट चौकशी केली पाहिजे.”
लाँग डिस्टन्सबद्दल मृणाल पुढे म्हणाली, “लाँग डिस्टन्स शक्य तर हल्ली नाहीच केलं पाहिजे. कारण आता हल्ली सगळं जग बदललंय. दहा अकरा वर्षा पूर्वीचं जगही वेगळं होतं आणि माणूस चांगला असेल तर कितीही लांब असला आपला माणूस तरी आपण मनाने जवळ असतो तो विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे त्यामुळे हल्लीच्या काळात मला माझ्यासाठी कठीण वाटतं.”
लाँग डिस्टन्सबद्दल पुढे मृणालचा नवरा नीरज म्हणाला, “मलाही तेच वाटतं. लाँग डिस्टन्स आता अवघड आहे आम्ही पण कसे राहिलो आमचं आम्हालाच माहिती आहे. पण तेव्हा ते झालं कारण आम्ही दोघेही करिअरवर लक्ष केंद्रीत करत होतो. पण एवढं तर श्क्यच नाही म्हणजे चार-पाच वर्षे लाँग डिस्टन्समध्ये नाहीच राहू शकतं.” मृणाल पुढे म्हणाली, “आता दहा वर्षे आमच्या लग्नाला झाली. पण त्यातली सात वर्षे आम्ही फोनवरच घालवली आहे. हे मन बावरे ही मालिका संपली त्यानंतरच २०२० ते २०२४ खरंतर हा चार वर्षांचाच आमचा संसार आहे.”
