Mrunal Dusanis Marriage : मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानीसने अनेक मालिकांमध्ये मुख्य नायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या शांत, सोज्वळ आणि संयमी भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम दिले. तिच्या भूमिकांसह मृणालचे वैयक्तिक आयुष्यही अनेकदा चर्चेमध्ये येते. यशाच्या शिखरावर असताना मृणाल दुसानीसने २०१६ मध्ये नीरज मोरे याच्याबरोबर लग्न केले. काही वर्षे लॉंग डिस्टन्समध्ये राहिल्यानंतर मृणाल परदेशामध्ये वास्तव्यास गेली होती. त्यानंतर आता तिने तिचे वैवाहिक आयुष्य आणि लग्न यांबद्दल काही आठवणी सांगितल्या आहेत.
मृणाल दुसानीसने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या अरेंज मॅरेज पद्धतीने ठरलेल्या लग्नाबद्दल, लाँग डिस्टन्स रिलेशनशिप आणि नवऱ्याबद्दलची माहिती दिली. यावेळी तिने लग्न ठरविताना झालेल्या गमती-जमती तसेच काही आठवणी शेअर केल्या आहेत. मूळची नाशिकची असलेल्या मृणालचे लग्न तिच्या वडिलांनी ठरवले होते. नाशिकमध्येच झालेल्या नीरज व मृणाल यांच्या विवाहसोहळ्यामध्ये चुकून राष्ट्रगीत वाजल्याची आठवण मृणाल दुसानीसने सांगितली आहे.
मृणाल दुसानिसचं लग्न कसं ठरलेलं?
‘लोकमत फ्लिमी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मृणालने तिच्या लग्नाबद्दलची माहिती दिली आहे. ती म्हणाली, “आमचं अरेंज मॅरेज झालं असून, माझ्या वडिलांच्या ओळखीतील एका काकांनी आम्हाला नीरजचं स्थळ सुचवलं होतं. त्यानंतर एके दिवशी त्याचा मला फोन आला आणि फोटो पाठवले. आमचं एकमेकांशी बोलणं झालं. मग आम्ही भेटायचं ठरवलं. आई-बाबा जे स्थळ सुचवतील ते चांगलंच असणार याची मला खात्री होती. आम्ही दोघं सहा महिने फोनवर बोलत होतो. मी परदेशामध्ये एका कार्यक्रमासाठी गेल्यानंतर आमची भेट झाली आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.”
पुढे मृणालने सांगितले, “आमचं लग्न तर नाशिकमध्ये झालं. लग्नामध्ये माझ्या बाबांनी मिलिट्री बॅण्ड आणला होता. तर ते लोक खूप छान आवरुन आणि तयार होऊन वादन करीत होते. पण लग्नामध्ये काही वेळानंतर त्यांनी ‘जन गण मन’ वाजवण्यास सुरुवात केली. लग्नामध्ये अचानक राष्ट्रगीत वाजल्यामुळे सर्व जण नाचणारे एकदम स्तब्धपणे उभे राहिले होते.”
या प्रसंगाबद्दल सांगताना मृणाल म्हणाली, “अचानक राष्ट्रगीत वाजवल्यानंतर मी बाबांकडे बघत होते आणि ते इकडे-तिकडे बघत होते. राष्ट्रगीताबद्दल आदर हा हवाच. पण हे जरा चुकलं का माझ्या लग्नात; पण जाऊ दे आता, असं मला वाटलं होतं,”
मृणाल दुसानिसचे मालिका विश्वात पुनरागमन
दरम्यान, १० वर्षांपूर्वी २०१६ मध्ये मृणाल दुसानीस व नीरज मोरे यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतरही मृणाल काही काळ भारतामध्ये राहत होती. ऑक्टोबर २०२० ‘हे मन बावरे’ ही मालिका संपल्यानंतर मृणाल डिसेंबर २०२० मध्ये अमेरिकेला गेली. त्यानंतर ती चार वर्षं अमेरिकेमध्ये राहिली आणि २०२२ मध्ये दोघांच्या आयुष्यात मुलीचं आगमन झालं. त्यांच्या लेकीचं नाव नुर्वी आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा मृणाल भारतामध्ये परतली असून, स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेद्वारे तिनं अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं.
