छोट्या पडद्यावरची लाडकी सून म्हणून मृणाल दुसानिसला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या अभिनेत्री ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारतेय. मृणाल साकारत असलेली नंदिनी प्रत्येकाला भावते. यापूर्वी सुद्धा मृणालने ‘हे मन बावरे’, ‘तू तिथे मी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
मृणालने वैयक्तिक आयुष्यात २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. मृणालचं अरेंज मॅरेज असून तिच्या पतीचं नाव आहे नीरज मोरे. नीरज कामानिमित्त अमेरिकेत असायचा. लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षे मृणाल भारतात आणि नीरज अमेरिकेत असा त्यांचा लाँग डिस्टन्स संसार सुरू होता. मात्र, ‘हे मन बावरे’ ही मालिका संपल्यावर लॉकडाऊनचा काळ सुरू झाला आणि मृणाल सुद्धा अमेरिकेत शिफ्ट झाली. २०२० पासून पुढची चार वर्षे मृणालने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता.
मार्च २०२४ मध्ये मृणाल आपल्या कुटुंबासह भारतात परतली. चार वर्षांनी भारतात परतण्याचा निर्णय का घेतला याबाबत मृणाल आणि नीरज यांनी ‘द अनुरुप शो’ या मुलाखतीत खुलासा केला होता. भारतात आल्यावर मृणाल व नीरज यांनी स्वत:चं रेस्टॉरंट देखील सुरू केलं आहे.
मृणाल भारतात परतण्याविषयी म्हणाली, “रेस्टॉरंट सुरू करायचं याबद्दल आमचं फार आधीपासून बोलणं व्हायचं. सुरूवातीला अमेरिकेत नीरजने अनेक कॅफेजमध्ये वगैरेही काम केलं होतं. त्यामुळे त्या कामाचाही त्याला अनुभव होता. मग काही वर्षांनी नुर्वी झाली. त्यावेळी आम्ही जरा नीट विचार केला. तेव्हा असं जाणवलं… नुर्वीला अमेरिकेत मोठं करण्यापेक्षा आपण आपल्या लोकांमध्ये जाऊयात.”
“नीरजला सुद्धा भारतात यायची इच्छा होती त्यामुळे मग… ती योग्य वेळ समजून आम्ही पुन्हा भारतात येण्याचा निर्णय घेतला. कारण, नुर्वी सध्या लहान आहे पण, एकदा तिला कळायला लागलं असतं…तेथील राहणीमान आवडू लागलं असतं तर, त्यानंतर आम्हाला पुन्हा भारतात येणं अवघड वाटलं असतं. पण, सध्या ती लहान आहे त्यामुळे आताच शिफ्ट होऊयात असं आम्ही ठरवलं आणि आम्ही दोघंही वेळेत निर्णय घेऊन पुन्हा मायदेशी आलो.” असं मृणालने सांगितलं.
मृणालचा पती नीरज सांगतो, “मी जवळपास १४ वर्षे अमेरिकेत होतो. पण, पण, अमेरिकेत राहूनही मला हे कुठे ना कुठे माहीत होतं की, आपल्याला पुन्हा भारतात जायचं आहे. भारतात येऊन पुन्हा आयटी क्षेत्रात काम न करता मला स्वत:चं काहीतरी सुरू करायचं होतं. अर्थात बिझनेसकडे कल होता आणि त्यात मृणालची साथ मिळाली. फूड ट्रक किंवा कॅफे सुरू करूयात याविषयी सुद्धा आमच्या चर्चा व्हायच्या. सध्या भारतात फूड ट्रक कल्चर त्याप्रमाणात लोकप्रिय झालेलं नाहीये. म्हणून मग आम्ही रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला.”
