Mrunal Dusanis reveals her close friends list in Marathi industry : मृणाल दुसानिस मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मृणालनं आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारत तिच्या सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात जणू कायमचं घर केलं आहे. सध्या ती ‘स्टार प्रवाह’वरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत नंदिनी ही भूमिका साकारत आहे.

मृणाल दुसानिस तिच्या साध्या स्वभावामुळे आणि साध्या राहणीमानामुळे अनेकांना आवडते. मृणाल स्वभावानं थोडी अबोल असून तिला इतरांमध्ये मिसळायला थोडा वेळ लागतो असं तिनं सुलेखा तलवळकरला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. यावेळी तिनं इंडस्ट्रीतील तिच्या मित्र-मैत्रिणींबद्दल सांगितलं आहे. मृणालनं यावेळी इंडस्ट्रीत तिचे फार मित्र-मैत्रिणी नाहीयेत असं म्हटलं आहे. मृणाल यावेळी नेमकं काय म्हणाली सविस्तर जाणून घेऊया…

मृणाल दुसानिस नेमकं काय म्हणाली?

मुलाखतीत सुलेखा तलवळकर यांनी मृणालला तुझी सगळ्यांशीच मैत्री होत असेल ना? असा प्रश्न विचारल्यानंतर अभिनेत्री म्हणाली, “नाही खरंतर. मी इतरांबद्दलची माझी मतं पटकन जाहीर करत नाही म्हणून माझं कोणाशी वितुष्ट नसेल. पण, एक आहे की मला मैत्री करायला वेळ लागतो आणि जर मग ती झाली तर माझ्या बाजूने मी ती कधीच पटकन संपवत नाही. माझी इंडस्ट्रीत फार कोणाशी मैत्री नाहीये. एकच माझी मैत्रीण आहे ती म्हणजे राजश्री. प्रिया मराठेसुद्धा होती आणि श्रेया बुगडे माझी चांगली मैत्रीण आहे. बाकी आता शशांक केतकर आणि शर्मिष्ठाशीसुद्धा माझी चांगली मैत्रीण आहे.”

Award Banner

मृणाल मैत्रीबद्दल पुढे म्हणाली, “अशी काही मोजकी माणसं आहेत जी मला ओळखतात. ज्यांच्याशी माझं बोलणं सुरू असतं. पण, इंडस्ट्रीत माझी फार कमी लोकांशी अशी मैत्री आहे.” मृणाल दुसानिस व शशांक केतकर यांनी एकत्र सुलेखा तलवळकरला मुलाखत दिली आहे. त्यावेळी दोघांनी त्यांच्या मैत्रीबद्दल सांगितलं आहे. मृणालनं यावेळी शशांक सेटवर कधीच वेळेत यायचा नाही अशी तक्रारसुद्धा केली आहे. तर शशांकनंसुद्धा इंडस्ट्रीत त्याचे फार कोणी मित्र-मैत्रिणी नसल्याचं म्हटल आहे.

दरम्यान, मृणाल व शशांक यांनी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेला संपून आता बरीच वर्षे झाली असून दोघांनी पहिल्यांदाच एकत्र मुलाखत दिली आहे. सध्या मृणाल ‘स्टार प्रवाह’वरील मालिकेत काम करत असून शशांकसुद्धा याच वाहिनीवरील ‘मुरांबा’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे