लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात योग्य समतोल साधताना दिसत आहे. अशातच आता तिने तिला आजही इतक्या सहज आणि मोकळेपणाने काम करता येतंय याचं कारण तिच्या सासूबाई आहेत असं सांगितलं आहे. अभिनेत्रीने पहिल्यांदाच खऱ्या आयुष्यातील सासूबाईंबद्दल भाष्य करत त्यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं आहे.
मृणाल दुसानिसने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नानंतर बदलेलं आयुष्य, लेकीचा जन्म आणि त्यानंतर पुन्हा अभिनय क्षेत्रात काम करणं याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने सगळं श्रेय तिच्या सासूबाईंना दिलं आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगताना तिने लग्नानंतर नवऱ्याबरोबर अमेरिकेत राहत असतानाचा अनुभव आणि पुन्हा भारतात परतण्याचा निर्णय याबद्दलही सांगितलं आहे.
मृणालने सासूबाईंचं केलं कौतुक
सासूबाईंबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यानंतर मृणाल म्हणाली, “मी आणि नीरज आता जे काही करू शकतोय ते सगळं आम्ही फक्त आईंमुळेच करू शकत आहोत. कारण त्या आहेत म्हणून आम्ही घराबाहेर पडू शकतोय. त्या आहेत म्हणून आम्हाला कुठली काळजी नसते. पण त्याही आता थकल्या आहेत जवळपास पासष्ट वर्षांच्या आहेत. पण आमचं सगळं काही त्या बघतात आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या लेकीचंही सगळं त्याच बघतात. आजी आणि नातीचं वेगळं नातं आहे पण त्या असल्यामुळे आम्ही आमचं करिअर करू शकतो आणि आम्हाला दोघांनाही वाटतं की घरात आजी-आजोबा असणं फार महत्त्वाचं असतं. आमची मुलगी कुठे गेली आहे, काय करते याची काळजी आम्हाला नसते. त्या तिला खूप छान छान गोष्टी शिकवत असतात.”
मृणालने याच मुलाखतीत तिच्या गरोदरपणातील अनुभवसुद्धा सांगितला आहे. अभिनेत्रीने ती अमेरिकेत असताना कोवीडदरम्यान तिथे तिच्याबरोबर फक्त तिचा नवराच होता कारण दुसऱ्या कोणाला येणं शक्य नसल्याने त्यांना ते कठीण गेल्यांचं तिने सांगितलं. याचसह अभिनेत्रीने तिच्या अरेंज मॅरेज लग्नाच्याही अनेक गंमतीशीर आठवणी सांगितल्या.
दरम्यान, मृणाल सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तिच्या या मालिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या मुलाखतीतून तिच्या सासूबाईसुद्धा तिच्या जुन्या मालिका पाहायच्या त्यामुळेही त्या तिला ओळखत होत्या असंही तिने सांगितलं आहे.
