Zee Marathi Sa Re Ga Ma Pa : ‘सारेगमप’ या कार्यक्रमाचा नवीन सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदा शोचं सूत्रसंचालन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे करत असून, अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत या लोकप्रिय गायकांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर नुकताच ‘झी मराठी’ वाहिनीवर पार पडला. यावेळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने एक खास कविता सादर केली.

मृण्मयीने देशपांडेने ‘सारेगमप’च्या मंचावर लाडक्या बहिणीला उद्देशून लिहिलेली एक खास कविता सादर केली. दोन भावंडांचं नातं विशेषत: मोठ्या भावाच्या आयुष्यात असलेलं धाकट्या बहिणीचं स्थान या आशयावर ही कविता लिहिण्यात आली आहे. या कवितेच्या शेवटच्या काही ओळी ऐकून प्रेक्षकांचे डोळेही पाणावले होते. ही कविता मृण्मयीने सादर केली असली तरीही याचा मूळ कवी केतन साळवी आहे.

लाडक्या बहिणीसाठी सुंदर कविता…

कधी उतू जायचं प्रेम, तर कधी विनाकारण रागवलीये
लाडकी बहीण योजना, मी लहानपणापासून राबवलीये!

कधी-कधी राग यायचा, फारच विचित्र वागायची
मला काही द्यायची नाही, माझं सगळं मागायची
चिडायची, रुसायची…तक्रार करून लपायची
रात्री मात्र माझी बहीण माझ्यावर तंगड्या टाकून झोपायची!

तिचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यात मी रात्र-रात्र जागवलीये,
लाडकी बहीण योजना, मी लहानपणापासून राबवलीये!

लग्नानंतर जेव्हा बहीण जाते तिच्या सासरी,
मोकळं होतं कपाट तिचं..सुनी वाटते ओसरी
मान्य आई-बाबांएवढं मी तिला कधी जपलं नाही
पण, तिला कुणी बोललेलं मला कधीच खपलं नाही!

कधी उतू जायचं प्रेम, तर कधी विनाकारण रागवलीये
लाडकी बहीण योजना, मी लहानपणापासून राबवलीये!

दरम्यान, ही कविता ऐकून अवधूत आणि वैशाली सुद्धा भारावून गेले होते. मृण्मयी कविता सादर करत असताना वैशालीने “ये बात…” म्हणत तिला दाद सुद्धा दिली. नेटकऱ्यांनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच कवी केतन साळवीचंही चाहत्यांनी विशेष कौतुक केलं आहे.