Mrunmayee Deshpande on Sa Re Ga Ma Pa: सध्या ‘सारेगमप’ हा झी मराठी वाहिनीवरील रिअॅलिटी शो लक्ष वेधून घेत आहे. या शोमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांतून स्पर्धक सहभागी झाले आहेत. या शोमध्ये अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत जज म्हणून काम करत आहेत. तर, मुग्णयी देशपांडे शोचे सूत्रसंचालन करत आहे.

“झी मराठीवर मी बऱ्याच मालिका आणि कार्यक्रम…”

आता मराठी सिरिअल्स ऑफिशिअलशी मृण्मयीने संवाद साधला. ती म्हणाली, “‘सारेगमप’च्या मंचावर सूत्रसंचालन करण्याची पुन्हा संधी मिळतेय, यासाठी मी खूप आनंदी आहे. मला स्वतःला गाणी ऐकायला फार आवडतात. सारेगमपमध्ये सूत्रसंचालन करणं, हे माझ्यासाठी झी कुटुंबात घरी परत आल्यासारखं आहे. कारण झी मराठीवर मी बऱ्याच मालिका आणि कार्यक्रम केले आहेत. माझ्या ‘कुंकू’ मालिकेनंतर ‘एका पेक्षा एक’, ‘जोडीचा मामला’, ‘अप्सरा आली’ आणि बरेच रिअॅलिटी शो मी केले. त्यानंतर ‘सारेगमप’चा प्रवास सुरू झाला. त्यामुळे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय आणि सुरेल प्रवास आहे. इथे खूप छान आणि आवडती गाणी ऐकायला मिळतात, अनेक आठवणी पुन्हा रंगतात. ‘सारेगमप’चं सूत्रसंचालन करताना एकदम मस्त आणि छान वाटतं.”

ती पुढे म्हणाली, “प्रत्येक स्पर्धकाचं एक वेगळं स्वप्न आणि संघर्ष असतो. मला वाटतं, स्पर्धेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत गाण्याबरोबरच आवाजात होणारा बदल खूप महत्त्वाचा असतो. पहिल्या दिवशी असलेला स्पर्धकाचा आवाज, त्याचं गाणं आणि स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्यावर त्याच्या गाण्यात झालेली प्रगती, वाढलेला आत्मविश्वास आणि स्टेजवर परफॉर्म करण्याची कला यामध्ये खूप मोठा बदल झालेला दिसतो. काही जण खूप छान गातात; पण सध्याच्या काळात व्यक्तिमत्त्व विकासही खूप महत्त्वाचा आहे. हे सगळं स्पर्धकांमध्ये आपोआपच विकसित होताना दिसतं. पहिल्या दिवसापासून फिनालेच्या आठवड्यापर्यंतचा हा प्रवास खूपच मजेशीर असतो.”

मृण्मयी सूत्रसंचालनाबरोबरच विविध भूमिकांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येते. सिनेमे, मालिकांतून मृण्मयीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दरम्यान, मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती आणि तिची बहीण गौतमी विविध व्हिडीओ शेअर करत सर्वांचे मनोरंजन करतात. त्याचे व्हिडीओ कायम लक्ष वेधून घेतात.