रक्षाबंधन हा सण भावंडांमधील प्रेम, आपुलकीचा खास दिवस असतो. रक्षाबंधनला आपला भाऊ आपल्याला काय गिफ्ट देणार याची उत्सुकता आजही प्रत्येक बहिणीच्या मनात असते. वाढत्या वयानुसार आणि जबाबदाऱ्यांनुसार प्रत्येकजण आपल्या आयुष्यात व्यग्र होतो पण, या सणाच्या निमित्ताने एकत्र भेट होते, बालपणीच्या सुंदर आठवणी पुन्हा एकदा मनात ताज्या होतात. आपल्या लाडक्या भावंडांसह घालवलेले क्षण, भांडणं, मजा…या सगळ्या आठवणी मोठं झाल्यावर खूपच खास वाटू लागतात. अशीच रक्षाबंधनची खास आठवण लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने सांगितली आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी देशपांडे. सध्या ती ‘सारेगमप’ या शोचं सूत्रसंचालन करतेय. मृण्मयी आणि गौतमी देशपांडे या दोन सख्ख्या बहिणींची जोडी चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या दोघी सोशल मीडियावर नेहमीच भन्नाट व्हिडीओ शेअर करत असतात. या बहिणींचं बॉण्डिंग चाहत्यांना सद्धा खूपच आवडतं. रक्षाबंधनच्या निमित्ताने मृण्मयीने बालपणीची खास आठवण सांगितली आहे.

मृण्मयी देशपांडे सांगते, “आमच्या घरी आम्ही दोघी ( मृण्मयी-गौतमी ) सख्ख्या बहिणी आहोत; पण आम्हाला सख्खा भाऊ नसला तरी सख्ख्या चुलत भावंडांची मोठी फौज आहे. जवळपास दहा फूटांच्या सोफ्यावरही न मावणारी भावंडं आमच्याकडे आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी भावंडांची एक लाईन आणि ओवाळणी करणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन असायची. सणाला भेटवस्तू, मिठाई आणि एकंदर घरात भरपूर धमाल असायची. बालपणी घर भावंडांनी अक्षरशः भरलेलं असायचं. आमच्या घरात जवळपास ५०-६० जण रक्षाबंधनासाठी एकत्र यायचे.”

“दिवसभराच्या गोंधळानंतर जेवण झालं की आम्ही सगळी भावंडं एका खोलीत जाऊन दोन-तीन तास झोपायचो. आमच्या त्या झोपलेल्या अवस्थेतील काही मजेशीर फोटो आणि व्हिडीओ आजही पाहिले की आम्हाला हसू आवरत नाही. मोठं झाल्यावर मात्र प्रत्येक नात्याला एक वेगळा आयाम मिळतो. आज आमचं नातं खूप प्रगल्भ झालं आहे. एकमेकांना न सांगताही अनेक गोष्टी समजतात, गरज पडली की आधार दिला जातो आणि भावना पटकन ओळखल्या जातात. भावंडांचं हे नातं आता आणखी घट्ट झालं आहे, याचा मला खूप आनंद आहे.”

दरम्यान, ‘सारेगमप’चा नवीन सीझन नुकताच सुरू झाला असून आता प्रेक्षकांना त्यांचे टॉप-१२ स्पर्धक भेटले आहेत. हा कार्यक्रम शनिवार आणि रविवार रात्री ९:३० वाजता प्रसारित केला जातो.