कलाकार म्हटलं की संघर्ष हा आलाच. पण, कधी कधी फक्त व्यावसायिक जीवनातच नाही तर खाजगी जीवनातही बऱ्याच अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं. काही कलाकार नावारुपाला येण्याआधी त्यांनी प्रचंड संघर्ष केल्याचं सांगतात. प्रत्येक कलाकाराची एक दुसरी बाजू असते, जी फक्त त्यालाच माहीत असते. परंतु, काही कलाकार त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या संघर्षाबद्दल स्पष्टपणे सांगत असतात. अशातच नुकतच एका अभिनेत्रीने तिचा संघर्षमय प्रवास सांगितला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या सासुबाई म्हणजेच अभिनेत्री मुग्धा शाह यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील संघर्षमय प्रवासाबद्दल सांगितलं आहे. मुग्धा यांनी नुकतीच ‘मराठी मनोरंजन विश्व’ला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी त्यांच्या खाजगी जीवनातील संघर्षमय प्रवासाबद्दल सांगितलं आहे. अलीकडेच मदर्स डे साजरा करण्यात आला. यानिमित्त त्यांनी त्यांच्या आईबद्दल यामध्ये सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “माझ्यासाठी आई हा शब्द खूप मौल्यवान आहे, कारण मी कधी माझ्या आईला पाहिलंच नाही.” त्यामुळे आई नसल्याने त्यांचे खूप हाल झाल्याचं त्यांनी यामध्ये सांगितलं आहे.
आईबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “मी तीन महिन्यांची असताना आई वारल्याने माझे खूप हाल झाले, त्यामुळे मला असं वाटतं की वडील नसले तरी मुलं मोठी होऊ शकतात. वडील नसले तरी तितका त्रास नाही होत, पण आई नसेल तर त्या बाळाचे खूप हाल होतात. आई गेल्यानंतर माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि तेव्हापासून सुख काय असतं हे मला माहित नाही; पण मी दुःख खूप भोगलं आहे. त्रास बघितला आहे, छळ बघितला, मार खाल्ला आणि उद्ध्वस्त आयुष्य बघितलं आहे.”
याबाबत बोलताना त्या पुढे म्हणाल्या, “माझे दोन वेळेच्या जेवणाचे हाल होते, त्यामुळे मला असं वाटायचं की काय अर्थ आहे या आयुष्याचा. मी २० वर्षांची असताना माझं लग्न झालं. पण, तोपर्यंत मी दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण, प्रत्येकवेळी मी त्या सगळ्यातून बाहेर आले आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ही एक दैवी शक्ती आहे.”
पुढे त्या म्हणाल्या, “मी आध्यात्माबद्दल खूप अभ्यास करते. कर्म, प्रारब्ध याबद्दल खूप वाचते, त्यामुळे आता मला त्या सगळ्या गोष्टींचा तितका त्रास होत नाही; पण त्या आठवणी अजून आहेत, त्या आपण विसरत नाही.”
दरम्यान, मुग्धा शाह यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी आजवर ‘पूछो मेरे दिल से’, ‘संभव असम्भव’, ‘गुनाह’, ‘दुर्वा’, ‘बे दुणे साडे चार’, ‘मिस मॅच’, ‘कर्तव्य’, ‘माहेर माझं पंढरपूर’ यांसारख्या अनेक हिंदी व मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.