‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे, मुग्धा-प्रथमेशचा साधेपणा चाहत्यांना विशेष भावतो. हे दोघंही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. गणेशोत्सवानिमित्त या दोघांचं एक नवीन गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. याशिवाय मुग्धा-प्रथमेशने त्यांच्या कोकणातील बाप्पाची झलकही चाहत्यांना दाखवली आहे.
गौरी-गणपतीचा सण म्हणजे प्रत्येक कोकणवासीयासाठी जिव्हाळ्याचा क्षण, गणपतीचे दिवस प्रत्येकाच्या घरात मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. कोकणातील घराघरांत रात्रीचं भजन, गोडाचे पदार्थ, बाप्पासाठी खास उकडीच्या मोदकांचा नैवेद्य केला जातो. प्रथमेश लघाटेचं गाव आणि मुग्धाचं सासर सुद्धा कोकणात आरवलीमध्ये आहे. त्यामुळे लग्नानंतर हे दोघंही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करताना दिसतात.

बाप्पासाठी सुंदर फुलांची आरास, उकडीचे कळीदार मोदक, केळीच्या पानावर नैवेद्य, पूजेसाठी ताजी फुलं या सगळ्याची झलक मुग्धाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

पोपटी रंगाची साधी-सुंदर साडी, गळ्यात मंगळसूत्र या लूकमध्ये मुग्धा खूपच सुंदर दिसतेय. मुग्धा-प्रथमेशच्या या साधेपणाचं नेटकऱ्यांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे.

या फोटोंना मुग्धाने ‘आरवलीचा बाप्पा’ असं कॅप्शन दिलं आहे. नेटकरी या फोटोंवर कमेंट्स करत लिहितात, “दोघंही खूपच गोड दिसताय”, “खूपच छान जोडी”, “गणपती बाप्पा मोरया”, “तुमचा हा साधेपणाच मनाला खूप जास्त भावतो”, “किती सुंदर दिसताय”, “बाप्पा आणि मोदक…”, “श्री व सौ. लघाटे नेहमीप्रमाणे सुंदर फोटो”, “सुरेख…हा खरा साधेपणा”, “तुमच्या दोघांबद्दल खूप अप्रूप वाटतं…तुमचं राहणीमान खूप साधं आणि सरळ आहे”, “सादगी में ही सुंदरता हैं खूप गोड दिसताय”, “उकडीचे मोदक आमचं फेव्हरेट कपल” अशा असंख्य प्रतिक्रिया या दोघांच्या फोटोंवर आल्या आहेत.
