‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे सहभागी झाले होते. या शोमुळे दोघांनाही लोकप्रियता मिळाली. शो संपल्यावर पुढे काही वर्षांनी प्रथमेश-मुग्धा एकत्र गाण्यांचे कार्यक्रम करू लागले आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मुग्धा-प्रथमेश यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्न केलं. नुकतीच त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली. लग्नानंतर मुग्धा-प्रथमेश प्रत्येक सणवार मोठ्या उत्साहाने साजरे करतात.
मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांची जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. साधं राहणीमान, उत्तम संस्कार यामुळे या जोडप्यावर नेटकरी कायम कौतुकाचा वर्षाव करत असतात. प्रेक्षकांची ही लाडकी जोडी गाण्यांच्या कार्यक्रमांसाठी नेहमीच विविध ठिकाणी दौऱ्यावर जात असते पण, या सगळ्यात वेळात वेळ काढून मुग्धा-प्रथमेश आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना दिसतात. होळीच्या सणाला मुग्धा सासरी गेली होती.
आता होळीला घराघरांत पुरणपोळ्या बनवल्या जातात हे आपल्याला माहीत आहेच. पण, पुरणपोळ्या बनवणं इतकं सोपं नाहीये. पुरणपोळ्या बनवताना सगळ्या गोष्टी प्रमाणात घ्याव्या लागतात, या पोळ्या अलगद लाटाव्या लागतात. हे सगळं मुग्धा तिच्या सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली केलं. याचा खास व्हिडीओ गायिकेने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुग्धाने होळीला पुरणपोळ्या बनवल्या होत्या. हा व्हिडीओ शेअर करत ती लिहिते, “नीना काकूच्या (सासूमाँ) हाताखाली पुरणपोळी करण्याचा प्रयत्न!
जरा अवघड आहे करणं… पण मजा आली! होळी पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा!”
मुग्धा अगदी लक्षपूर्वक आणि मनापासून या पुरणपोळ्या बनवत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. बायकोचं पाककौशल्य पाहून यावर प्रथमेशने खास ‘रेड हार्ट लव्ह’ इमोजी देऊन कमेंट केली आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी सुद्धा या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
“भारीच जमलीये”, “अरे किती छान बनवलीये”, “सर्वगुण संपन्न सून”, “जोरदार किती मस्त”, “अगं किती मस्त जमलीये…पुरणपोळी”, “अरे वाह मुग्धा”, “आमची मुग्धा सुगरण आहे”, “खूप छान जमल्यात” अशा कमेंट्स या व्हिडीओ तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत.
