‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे मुग्धा वैशंपायन घराघरांत लोकप्रिय झाली. मुग्धाने वैयक्तिक आयुष्यात डिसेंबर २०२३ मध्ये प्रथमेश लघाटेशी लग्न केलं. तिचं सासर कोकणातील संगमेश्वरात आरवली येथे आहे. काही दिवसांपूर्वी एक सुंदर व्हिडीओ शेअर करत मुग्धाने तिच्या सासरच्या घराची झलक सर्वांना दाखवली होती. आता गायिकेने शेअर केलेला कोकणातील संस्कृतीची झलक दाखवणारा आणखी एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांची जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. साधं राहणीमान, उत्तम संस्कार यामुळे या जोडप्यावर नेटकरी कायम कौतुकाचा वर्षाव करत असतात. मुग्धाने नुकताच सासरी एक पारंपरिक कोकणी पदार्थ बनवला होता. या पदार्थाचं नाव आहे ‘नीर फणसाचे काप’. गायिकेने व्हिडीओ शेअर करत नीर फणसाचे काप कसे असतात आणि या पदार्थाची सविस्तर रेसिपी चाहत्यांना सांगितली आहे.

मुग्धा म्हणते, “माझ्या जाऊबाईंनी रत्नागिरीतील कसोप गावाहून नीर फणस आणला होता. या नीर फणसाचे फ्राय काप केले जातात. नीर फणस आणल्यावर आधी मी तो स्वच्छ केला. त्याचे आडवे काप कापून घेतले. त्यात लाल-तिखट, मीठ घातलं. त्यानंतर थोड्यावेळाने या कापांना थोडंसं पाणी सुटलं. मग, मी या कापांना छानपैकी रवा लावला आणि तव्यावर छान फ्राय केले. त्यानंतर आम्ही हे काप साध्या आमटी-भाताबरोबर खाल्ले. इतके सुंदर लागतात की, काय सांगू”

नीर फणस हा आकाराने लहान असतो आणि याला फार काटे नसतात. फणसाप्रमाणे यामध्ये आतील बाजूस गरे नसतात, तर आत पांढरा आणि मऊ गर असतो. याचेच फणसाचे काप बनवतात. मुग्धाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सुकन्या मोनेंनी या व्हिडीओवर “तोंडाला पाणी सुटलं” अशी कमेंट केली आहे.

तर, मुग्धाचा व्हिडीओ पाहून अन्य नेटकरी म्हणतात, “वाह मुग्धा ऑल टाइम फेव्हरेट”, “आपला पारंपरिक कोकणी पदार्थ”, “तिखट डाळ आणि नीर फणसाचे काप आणि काय हवं?”, “मस्त गोव्याची आठवण झाली…तिथे असे काप सगळीकडे मिळतात”, “वाह मुग्धा ताई…हे काप म्हणजे सुख” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे सहभागी झाले होते. या शोमुळे दोघांनाही लोकप्रियता मिळाली. शो संपल्यावर पुढे काही वर्षांनी प्रथमेश-मुग्धा एकत्र गाण्यांचे कार्यक्रम करू लागले आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मुग्धा-प्रथमेश यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्न केलं.