Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे घराघरांत लोकप्रिय झाले. हा शो संपल्यावर पुढे काही वर्षांनी मुग्धा-प्रथमेश एकत्र गाण्यांचे कार्यक्रम करू लागले. यादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. कालांतराने या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन या जोडप्याने डिसेंबर २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली.

मुग्धा-प्रथमेशचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. दोघांचाही साधेपणा कायम प्रेक्षकांना भावतो. याशिवाय दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या दैनंदिन आयुष्यातील विविध गोष्टी हे दोघेही चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. लग्नानंतर मुग्धा-प्रथमेश सगळे सणवार आनंदाने साजरे करतात. याशिवाय नेहमीच आपल्या मराठी परंपरा जपतात. यामुळे या जोडप्याचं सोशल मीडियावर देखील कौतुक केलं जातं. सध्या गायिकेने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चर्चेत आला आहे.

मुग्धाची सासुरवाडी म्हणजेच प्रथमेश लघाटेचं मूळ घर कोकणात आरवली येथे आहे. त्यांच्या घरी दर गुरुवारी भजनसेवा केली जाते. मुग्धा-प्रथमेशसह त्यांचे सगळे कुटुंबीय एकत्र येऊन भजन सेवा करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

प्रथमेश या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहितो, “नित्य गुरुवार भजन परंपरा! “हरे राम कृष्ण गोविंद जय हरे राम”च्या नामघोषात आणि श्रीदत्तगुरूंच्या चरणी लीन होऊन त्यांच्याच कृपेने आमची गुरुवारची भजन परंपरा अखंडपणे सुरू आहे. भक्तीचा हा आनंद आणि सात्त्विक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न! खूप दिवसांनी मी आणि मुग्धा आमच्या आरवलीतील नित्य गुरुवार भजनाला हजर होतो..तेव्हाचा हा छोटा व्हिडीओ..”

मुग्धा – प्रथमेशच्या घरातील हे भक्तीमय वातावरण पाहून नेटकऱ्यांनी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “श्री राम कृष्ण हरी”, “ही परंपरा गावोगावी असावी अगदी उत्तम”, “वाह खूपच छान माऊली”, “याला म्हणतात घर”, “घरात असं सुंदर वातावरण असावं”, “किती सुंदर आहे हा व्हिडीओ”, “वाह उत्तम” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.